भारतीय सैन्य अलर्ट ः अमो चू खोऱयात चीनकडून निर्मितीकार्ये
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डोकलामनजीक चीन सातत्याने स्वतःच्या सैनिकांची संख्या वाढवत असल्याने भारतीय सैन्याने चिंता व्यक्त केली आहे. भूतानच्या अमो चू खोऱयानजीक चीनने मोठय़ा संख्येत स्वतःच्या सैनिकांसाठी बंकर्स तयार केले आहेत. चीनने अमो चू भागात स्वतःच्या सैनिकांसाठी 1 हजार घरे तयार केली असल्याचे समोर आले आहे. चीनकडून निर्मित या सर्व इमारती डोकलामपासून अत्यंत नजीक असल्याने भारताच्या चिंता वाढणार आहेत.
अमो चू खोरे हे सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण डोकलाम पठारानजीक आहे. येथूनच भारताचा सिलिगुडी कॉरिडॉर नजीक आहे. तसेच भारत-चीन-भूतानच्या डोकलाम ट्राय-जंक्शनपासून काही अंतरावर हे अमो चू खोर आहे. डोकलाम भागात चीनने 2017 मध्ये रस्तेनिर्मितीचा प्रयत्न केल्यावर भारताने हस्तक्षेप केला होता. यामुळे भारत आणि चीन यांचे सैन्य दीर्घकाळापर्यंत परस्परांसमोर उभे ठाकले होते.
चीन स्वतःच्या सैन्यासाठी डोकलानजीक सुविधा निर्माण करत स्वतःचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. 2017 मध्ये डोकलाममध्ये भारतीय सैन्याकडून चीनविरोधात प्रत्युत्तरादाखल ठोस कारवाई करण्यात आली होती. चीन आता नव्या सुविधा निर्माण करून डोकलामच्या पश्चिम दिशेला भारतीय सुरक्षा व्यवस्थेला बायपास करू पाहत असल्याचे मानले जात आहे.
डोकलामच्या पश्चिमेला चीन नियंत्रित भूतानी क्षेत्रात कुठल्याही प्रकारच्या हालचालींमुळे भारतीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकताहे. डोकलामनजीकच्या भागात नियंत्रणामुळे चीनला सामरिक लाभ मिळेल असे भारतीय सुरक्षातज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय सैन्याने अलिकडेच ‘हा’ जिल्हय़ातील प्रशासकीय अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. यादरम्यान बैठकीत चीनच्या निर्मितीकार्यांबद्दल सांगण्यात आले आहे. चीनकडून निर्मितीकार्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त क्षेत्रांच्या पूर्व दिशेला ‘हा’ जिल्हा आहे.









