मुस्लीमविरोधी हिंसेच्या आरोपावर सीतारामन यांचे प्रत्युत्तर ः पाकिस्तानात हिंदूंची संख्या मात्र घटतीच
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेच्या दौऱयावर असणाऱया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतात मुस्लिमांच्या विरोधातील कथित हिंसेच्या मुद्दय़ावर भूमिका मांडली आहे. भारतात कधीच पाऊल न ठेवलेल्या लोकांनी मुस्लीमविरोधी हिंसा होत असल्याचे चुकीचे मत तयार केले आहे. भारतात मुस्लिमांच्या विरोधात हिंसा झाली असती तर त्यांची लोकसंख्या वाढली नसती. भारतात जगातील दुसऱया क्रमांकाची मुस्लीम लोकसंख्या राहत असल्याचे सीतारामन यांनी टीकाकारांना सुनावले आहे. वॉशिंग्टनमध्ये पीटरसन इन्स्टिटय़ूट फॉर इंटरनॅशनल इकोनॉमिक्समध्ये (पीआयआयई) भारतातील आर्थिक विकासाच्या मुद्दय़ावर त्या बोलत होत्या.
भारतासंबंधी तयार झालेली धारणा गुंतवणुकीला प्रभावित करत आहे का असा प्रश्न पीआयआयईचे अध्यक्ष ऍडम एस पोसेन यांनी विचारला होता. याचे उत्तर भारतात येत असलेले गुंतवणूकदारच देऊ शकतात. जर कुणाला गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर त्याने भारतात येऊन काय घडतेय हे स्वतःच्या डोळय़ांनी पहावे. भारताच्या भूमीवर कधीच पाऊल न ठेवलेल्या लोकांचे मत ऐकू नये असे सीतारामन म्हणाल्या.
भारतात सरकारच्या मदतीने मुस्लिमांचे जीवन असहय़ करण्यात आल्याचे खोटे वृत्त पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून वेगाने फैलावले जात आहे. परंतु खरोखरच असे घडत असल्यास 1947 च्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या इतकी वाढली असती का असा प्रश्न मी संबंधितांना विचारू इच्छित असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानात अल्पसंख्याकांची (हिंदू, ख्रिश्चन) स्थिती सातत्याने बिकट होत चालली आहे. पाकिस्तानात दिवसेंदिवस अल्पसंख्याकांची संख्या कमी होत चालली आहे. खोटे आरोप करून अल्पसंख्याकांना पाकिस्तानात मृत्युदंड दिला जात आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये ईशनिंदा कायदा हा वैयक्तिक शत्रुत्व साधण्याचा स्रोत ठरला आहे. पाकिस्तानात काही मुस्लीम समुदायांनाही लक्ष्य केले जात असल्याचा दावा सीतारामन यांनी केला.
पाकिस्तानात मुहाजिर, शिया आणि अहमदी समुदायांना मुख्य प्रवाहात स्वीकारण्यात आलेले नाही. तेथे अशा समुदायांच्या विरोधात हिंसा होत आहे. तर दुसरीकडे भारतात मुस्लीम स्वतःचा व्यापार-व्यवसाय करत आहेत, त्यांच्या मुलामुलींना सर्वप्रकारचे शिक्षण मिळत आहे. सरकार त्यांना फेलोशिप देत असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
भारतात येऊन सिद्ध करावे
पूर्ण भारतात मुस्लिमांच्या विरोधात हिंसा होत राहिली असती तर ते प्रभावित झाले असते. पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून करण्यात येणारा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट आहे. 2014 पासून आतापर्यंत मुस्लिमांची संख्या घटली आहे का? कुठल्याही एका समुदायामध्ये मृत्यूंचा आकडा खूपच वाढला आहे का या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ हेच आहे. याचमुळे अशाप्रकारचे खोटे वृत्त अहवाल लिहिणाऱयांनी भारतात येऊन स्वतःचे आरोप सिद्ध करावेत असे आव्हान सीतारामन यांनी दिले आहे.









