अध्याय सविसावा
साधूंच्या आठ लक्षणाचा अभ्यास आपण केला. आपली आध्यात्मिक वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने साधकाचे प्रयत्न चालू असतात. त्याला ही आठ लक्षणे हातभार लावतात. आपल्या शरीरातील आपला आत्मा सत्व, रज, तम या त्रिगुणांनी लिप्त झालेला असतो. त्यामुळे मी म्हणजे हे शरीर असे तो समजत असतो तसेच समोर दिसणारा संसार हा खरं आहे असं आपण समजत असतो. त्यामुळे परिस्थितीनुरूप आपली भली बुरी वागणूक होत असते आणि त्यातून आपले गुण प्रकट होत असतात. अर्थातच प्रत्येकाच्या बाबतीत हे गुणांचं प्रकटीकरण वेगवेगळे असते आणि म्हणूनच प्रत्येकाचा स्वभावही वेगवेगळा असतो. साधू मात्र तसे नसतात. त्या सगळय़ांचा स्वभाव एकसारखाच असतो. उदाहरणार्थ निरनिराळय़ा काळातील संतांची चरित्रे आठवून पाहिल्यास लक्षात येईल की कमीजास्त प्रमाणात मान अपमानाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात आलेले आहेत. तसेच बहुतेकांनी आर्थिक अडचणीतून, शारीरिक त्रासातून मार्ग काढलेले आहेत पण विशेष म्हणजे काळ कोणताही असुदेत त्यांची समाजाबरोबरची वागणूक एकसारखीच होत होती. या सगळय़ाचं मुख्य कारण म्हणजे, स्वतःच्या मूळ स्वभावाला मुरड घालून भगवंतांनी सांगितलेली साधूंची निरपेक्षता, निर्मोही, प्रशान्तता, बंधुभाव, समदर्शीपणा, निर्मम, निरभिमानी, अपरिग्रही ही आठ लक्षणे त्यांनी पुरेपूर आत्मसात केलेली होती. ही साधूंची अष्ट लक्षणे म्हणजे ब्रह्माची अष्ट अंगेच होत. किंवा या निर्गुण होण्यासाठी आवश्यक असलेल्या अष्टमहासिद्धीच होत. यांना महासिद्धी म्हणायचे कारण म्हणजे, ज्याप्रमाणे सिद्धी मिळवण्यासाठी अत्यंत कष्ट पडतात, त्याप्रमाणे हे आठ गुण आत्मसात करण्यासाठी संयमाच्या माध्यमातून फार प्रयत्न करावे लागतात. चैतन्य सरोवरातील आठ पाकळय़ांचे हे कमळच म्हणायचे. असे हे संतांचे-स्वानंदशील साधूचे लक्षण आहे कारण या आठ गुणांमुळे साधू मंडळी स्वानंद सरोवरात पोहत असतात. त्यांच्या आनंदाला स्वानंद म्हणायचे कारण म्हणजे सामान्य माणसाचा आनंद हा कोणत्या ना कोणत्या कारणावर अवलंबून असतो, तसेच ते कारण संपुष्टात आले किंवा त्यातील नाविन्य ओसरले की, त्यातून मिळणाऱया आनंदाचा दर्जा कमी कमी होत जातो व शेवटी त्यातून आनंद मिळण्यासारखे काहीच उरत नाही परंतु साधूंचा आनंद हा कोणत्याही कारणावर अवलंबून नसल्याने ते स्वतःच्या गुणांच्या माध्यमातून निर्माण होणाऱया आणि कधीही न संपणाऱया आनंदात मश्गुल असतात. त्यामुळे दुःखी असलेला साधू कधीच पाहायला मिळत नाही. तो इतरांच्या दुःखाच्या वेळी दुःखी झाल्याचे दाखवेल किंवा इतरांच्या सुखाच्यावेळी आनंदी असल्याचे भासवेल पण ते तात्पुरतेच असते कारण जगात सुखही नाही आणि दुःखही नाही हे ते जाणून असतात. हे सगळे समजून घेतले की लक्षात येते की, साधुंनी अत्यंत परिश्रमाने आत्मसात केलेले असे आठ श्रेष्ट गुण सर्व भूषणांना-भूषण असे आहेत. ते पूर्णपणे ज्यांच्या अंगी बिंबतील ते साधु-सज्जन अत्यंत पवित्र होत. तुकाराम महाराजांनी त्यांच्या सुप्रसिद्ध अभंगात हेच नमूद केले आहे. ते म्हणतात, जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलें ।।1।। तो चि साधु ओळखावा। देव तेथें चि जाणावा ।।2।। मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ।।3।। ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ।।4।। दया करणें जें पुत्रासी। ते चि दासा आणि दासी ।।5।। तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या मूर्ति ।।6।। भगवंतानी सांगितलेले साधूंचे गुण बुवांनी एकाच अभंगात गुंफलेले असून बुवा शेवटी म्हणतात, साधूंच्या गुणाबद्दल किती किती सांगू तेव्हढ थोडंच आहे. साधू हे चालते बोलते भगवंतच असतात. हे संत साधू मंडळींनी आत्मसात केलेले गुण पाहिले की, साधकालाही आपण त्यांच्यासमान व्हावे असे वाटू लागल्यास नवल नाही.








