श्वानाच्या नावावर विश्वविक्रम
जगातील सर्वात उंच पुरुष, महिलेबद्दल तुम्ही निश्चितच ऐकले असेल, परंतु कधी टीव्हीच्या रिमोटपेक्षा लहान किंवा पॉकेट साइज श्वान पाहिला आहे का? गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने दोन वर्षाच्या चिहुआहुआ प्रजातीच्या श्वानाला हा मान दिला आहे. याची उंची अन् आकार पाहता हा श्वान सहजपणे तुमच्या खिश्यात किंवा हँडबॅगमध्ये सामावू शकतो.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार 1 सप्टेंबर 2020 रोजी जन्मलेल्या पर्ल या श्वानाची उंची केवळ 9.14 सेंटीमीटर (3.59 इंच) आहे. तर लांबी 12.7 सेंटीमीटर (5 इंच) इतकी आहे. या श्वानाचे वजन केवळ 533 ग्रॅम आहे.

पर्ल चिहुआहुआ श्वान मिरेकल मिली या श्वानाच्या वंशातील आहे. मिरेकल मिली या श्वानाने यापूर्वी जगातील सर्वात छोटा श्वान असण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला होता. मिलीप्रमाणे पर्ल देखील जन्मावेळी केवळ 28 ग्रॅम वजनाचा होता. या श्वानाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे याचा शांत अभाव आहे. अशाप्रकारचा स्वभाव अन्य चिहुआहुआ श्वानांमध्ये फारच कमी प्रमाणात दिसून येतो.
पर्लच्या मालकीण वनेसा सेमलर यांनी अलिकडेच स्वतःच्या श्वानाला एका इटालियन शोमध्ये सादर केले होते. आमच्याकडे पर्ल असल्याने आम्ही सुदैवी आहोत. आम्हाला आमचाच विक्रम मोडण्याची संधी मिळाल्याचे वनेसा यांनी या शोमध्ये म्हटले होते.

पर्लडच्या या जागतिक विक्रमाची माहिती गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका छायाचित्राद्वारे देण्यात आली आहे. ‘जगातील सर्वात छोटय़ा श्वानाला हॅलो म्हणा’ अशी कॅप्शन या छायाचित्राला देण्यात आली. या पोस्टला आतापर्यंत 13 हजारांहून अधिक लाइक्स प्राप्त झाल्या असून युजर्स त्यावर कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
यापूर्वी मागील वर्षी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने दोन वर्षीय अमेरिकन ग्रेट डेन प्रजातीचा श्वान जीयसला जगातील सर्वात लांब श्वानाचा पुरस्कार दिला होता. या श्वानाची लांबी 3 फूट 5.18 इंच इतकी आहे. जीयस हा डेव्हिस कुटुंबासोबत अमेरिकेच्या टेक्सासमधील बेडफोर्ड शहरात राहतो.









