काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा आरोप ः बळजबरीने गप्प बसविणे तोडगा नव्हे
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँगेसच्या संसदीय समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारबद्दल मतप्रदर्शन केले आहे. देशाला गप्प करून देशाच्या समस्यांवर तोडगा निघणार नाही. पंतप्रधान मोदी हे महत्त्वाच्या मुद्दय़ांवर मौन बाळगून आहेत. त्यांच्या सरकारच्या कामकाजामुळे कोटय़वधी लोकांचे जीवन प्रभावित होते. महत्त्वाच्या मुद्दय़ांवर योग्य प्रश्न विचारण्यात आल्यावर पंतप्रधान मोदी मौन धारण करत असल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला आहे.
सद्यस्थितीत पंतप्रधान मोदींच्या बोलण्यात आणि कृत्यात मोठा फरक असल्याचे भारतातील लोक आता जाणून आहेत. विरोधकांवर संताप व्यक्त करत नसल्यास किंवा सद्यकाळातील समस्यांकरता पूर्वीच्या सरकारांवर आरोप करत नसल्यास पंतप्रधान मोदींच्या सर्व वक्तव्यांमधून महत्त्वाचे मुद्दे गायब होतात. अन्यथा मोठमोठी आश्वासने देत लोकांचे संबंधित मुद्दय़ांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सोनियांनी केला आहे.
देशाचा आवाज गप्प करून देशाच्या समस्या सुटणार नाहीत. शेतकऱयांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे स्वतःचे आश्वासन पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यावर पंतप्रधान मोदी आरामात मौन राखून आहेत. तर दुसरीकडे वाढता खर्च आणि पिकाच्या कमी होत चाललेल्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अर्थमंत्र्यांनी स्वतःच्या अर्थसंकल्पीय भाषणात बेरोजगारी आणि महागाईचा उल्लेख केला नाही, जणू त्यांच्यासाठी या समस्याच नाहीत. त्यांचे हे मौन दररोज दूध, भाजी, खाद्यतेल अन् गॅस खरेदी करणाऱया लोकांच्या काय कामाचे? सर्वाधिक बेरोजगारी दरामुळे संकटात सापडलेल्या तरुणाईला हे मौन सलत आहे. पंतप्रधान मोदी हे चिनी घुसखोरी नाकारत असल्याचे आम्ही पाहिल्याचा दावा सोनियांनी केला आहे.
देशात द्वेष अन् हिंसेचे वातावरण
भाजप आणि संघाने देशात द्वेष अन् हिंसेला बळ दिले होते, आता ही हिंसा वाढत चालली असून पंतप्रधान याकडे दुर्लक्ष करत आहेत. पंतप्रधानांनी एकदाही शांतता किंवा सौहार्द कायम राखण्याबद्दल तोंड उघडलेले नाही. तसेच दोषींवर कारवाई करण्याबद्दल भूमिका मांडलेली नाही. धार्मिक सण आता आनंद आणि उत्सवाचे पर्व राहिले नाहीत, तर इतरांना घाबरविण्याची आणि त्रास देण्याची संधी ठरले आहेत. लोकांना आता त्यांचे धर्म, आहार, जात अन् भाषेच्या आधारावर वेगवेगळे केले जात असल्याचा आरोप काँग्रेस खासदाराने केला आहे.
विरोधकांचा आवाज दडपला
मजबूत विरोधी पक्ष असल्याने नरेंद्र मोदी सरकारने विरोधी पक्षाचा आवाज दडपण्यासाठी अनेक पावले उचलली. सरकारने विरोधी खासदारांचे भाषण हटविले, आम्हाला चर्चा करण्यापासून रोखले, विद्युतवेगाने एका काँग्रेस खासदाराचे सदस्यत्व रद्द केले. या सर्व प्रकारांमुळे 45 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प कुठल्याही चर्चेशिवाय संमत झाला. मोदी सरकारने सीबीआय अन् ईडीचा केलेला दुरुपयोग सर्वांनाच माहिती आहे. 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुन्हे केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवर नोंदविण्यात आले आहेत. तर भाजपप्रवेश करणाऱया नेत्यांवरील गुन्हे एखाद्या जादूप्रमाणे गायब होत असल्याचा दावा सोनियांनी केला आहे.
पुढील काही महिने कसोटीचे
पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांनंतरही भारतातील लोकांचा आवाज त्यांना दडपून टाकता येणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही. आगामी काही महिन्यांमध्ये आमच्या लोकशाहीची कठोर परीक्षा होणार आहे. मोदी सरकार प्रत्येक शक्तीचा गैरवापर करत असून मोठय़ा राज्यांमध्ये निवडणुकांना प्रभावित करत आहे. काँग्रेस पक्ष थेट लोकांपर्यंत स्वतःचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही समान विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत मिळून देशाची घटना आणि त्याच्या आदर्शांचे रक्षण करणार आहोत असे सोनियांनी म्हटले आहे.









