ट्रेनचा संपूर्ण डबा पेटवण्याचा होता कट; अन्य साथीदारांचा शोध सुरू
रत्नागिरी प्रतिनिधी
केरळ रेल्वे अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरूख सैफी यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. पेट्रोलच्या बाटल्या घेवून प्रवास करणाऱ्या सैफी याला ट्रेनचा पूर्ण डबा पेटवून द्यायचा होता, अशी माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणात त्याचे आणखी काही साथीदार असण्याची शक्यता वर्तवली जात असून केरळ पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
केरळ पोलिसांसोबतच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) देखील या अग्निकांडाचा तपास करत आहे. प्राथमिक तपासात सैफी हा दिल्ली येथील शाहीनबाग परिसरातील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अलिकडच्या काळात त्याच्यावर दहशतवादी विचारसणीचा प्रभाव पडत होता. तसेच त्याला अनुचित प्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून त्याची मागील काही महिन्यातील दिनक्रमाचा आढावा पोलिसांकडून घेतला जात आहे.
सैफी दिल्ली येथून बेपत्ता झाल्याची नोंद त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांत दाखल केली होती. यानंतर तो केरळपर्यंत कसा आला, या बाबतचा उलघडा होऊ शकलेला नाही. सैफी याला कोणीतरी केरळ येथे घेवून आले असावे. या ठिकाणी तो काही दिवस वास्तव्य करत असल्याने त्याच्याशी कोण व्यक्ती संपर्कात होत्या, याचा तपास केला जात आहे. यासाठी सैफी याचा मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला असून मागील 6 महिन्यातील कॉल डिटेल्स, व्हॉटसॲप, फेसबुक वरील संभाषण आदींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
केरळमध्ये 3 एप्रिल रोजी रात्री 9.45 वा. अल्लपुझा कन्नुर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसमध्ये शाहरुख सैफी याचा सह प्रवाशासोबत जोरदार वादावादीची घटना घडली होती. त्या झालेल्या वादातून सैफीने त्या प्रवाशांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवले होते. त्या आगीचा भडका रेल्वेच्या डब्यात पसरला होता. त्या प्रकाराने भयभीत झालेल्या काही प्रवाशांनी चालत्या रेल्वेमधून बाहेर उड्या मारल्या. या घटनेत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर 9 जण गंभीर जखमी झाले होते. या खळबळजनक घटनेनंतर सैफी पसार झाला होता.
केरळ येथून फरार झालेल्या सैफी याने थेट रत्नागिरी गाठले होते. या संशयिताचा केरळ पोलिसांसह केंद्रीय गुप्तचर यंत्रणा शोध घेत होती. रत्नागिरी पोलीस व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तरित्या कारवाई करत 4 एप्रिल 2023 रोजी रात्रीच्या सुमारास सैफी याला रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरातून ताब्यात घेतले होते. यावेळी महाराष्ट्र एटीएस पथकाने सैफी याची चौकशी केली होती. यावेळी केरळ येथील घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय महाराष्ट्र एटीएसकडून व्यक्त करण्यात आला होता.
केरळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सैफी याला कावीळीचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला कोझीकोडे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सैफी याच्या कावीळ आजारामुळे पोलिसांच्या तपास कामात अडथळे निर्माण होत आहेत.