आमदार दिगंबर कामत यांचे उद्गार, नूतनीकरण केलेल्या मैदानाचे उद्घाटन, आवश्यक सर्व गोष्टी जाग्यावर घालणार
मडगाव : मडगावातील लोहिया मैदान हे लोकशाहीचे प्रतीक आहे. येथील ट्रान्सफॉर्मर्स हटविण्यात येतील तसेच मागील बकाल स्वऊपातील कोमुनिदाद इमारत दिसणार नाही याची काळजी घेतली जाईल. आपण हे सरकारच्या नजरेस आणून दिले आहे, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सोमवारी नूतनीकरण करण्यात आलेल्या लोहिया मैदानाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना सांगितले. लोहिया मैदानावर आवश्यक असलेल्या सर्व बाबी जाग्यावर घालण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. टीकाकारांना टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यास आपला आक्षेप नाही. मात्र सकारात्मक टीका करावी. टीका करताना टीकाकारांनी डॉ. लोहिया यांचे लोकशाहीचे तत्त्व लक्षात ठेवावे, असा सल्ला देण्यास आमदार कामत विसरले नाहीत. यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्षा दिपाली सावळ, क्रांतिदिन समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, मुख्याधिकारी मानुएल बार्रेटो, स्थानिक नगरसेविका डॉ. रोनिता आजगावकर कवळेकर तसेच स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर, गंगाधर लोलयेकर आणि विष्णू आंगले व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. लोहिया मैदान मडगावात असले, तरी पूर्वी लोहियांच्या स्मृती जागविणारा कार्यक्रम पणजीत व्हायचा. स्व. मधुकर मोर्डेकर, स्व. गुरुनाथ केळेकर आणि इतरांनी तो मडगावात आणावा अशी मागणी लावून धरली आणि आपण पाठपुरावा करून तो मडगावात आणला. त्यानंतर येथे शासकीय कार्यक्रम आयोजित करणे सुरू झाले. नंतर डॉ. लोहियांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. आता मैदानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे, असे आमदार कामत यांनी सांगितले. डॉ. लोहिया यांच्यासोबत वावरलेले तीन स्वातंत्र्यसैनिक येथे उपस्थित असून ते या लोहिया मैदानाचे तसेच मुक्तीलढ्याचे ते स्तंभ आहेत, असे उद्गार नगराध्यक्ष शिरोडकर यांनी यावेळी काढले. तसेच या मैदानाच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे आणि टीका करणाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले. या ठिकाणी डॉ. लोहियांचा पुतळा उभा राहावा यासाठी सरकार दरबारी खूप प्रयत्न करावे लागले होते, याची आठवण करून देऊन स्वातंत्र्यसैनिक प्रभुगावकर यांनी आता मैदानाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नवनाथ खांडेपारकर यांनी सूत्रसंचालन केले. रजनी रायकर यांनी आभार मानले. यावेळी संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला.
‘मंत्रिमंडळात समावेशाबाबत काहीही माहिती नाही’
वरील कार्यक्रमानंतर पत्रकारांनी आमदार दिगंबर कामत यांचे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची आणि त्यात त्यांना तसेच आलेक्स सिकेरा यांना स्थान मिळण्याची चर्चा चालली आहे याकडे लक्ष वेधले असता आपल्याला त्याविषयी काही माहिती नसल्याचे उद्गार कामत यांनी काढले. अॅड. राधाराव ग्रासियश यांच्यासह काहींनी कामत यांना सभापतीपद मिळण्याची शक्यता बोलून दाखविली आहे. याबद्दल विचारले असता कामत म्हणाले की, त्यांनी आपल्या आकलनानुसार मते व्यक्त केलेली असतील. पण आपल्याला याविषयी काहीही माहिती नाही.









