मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा, : जागतिक होमियोपॅथी दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान
पणजी : भारत देशात आयुर्वेदाला फार पूर्वीपासून महत्त्व आहे. मध्यंतरीच्या काळात याचा प्रसार आणि प्रचार काही प्रमाणात थांबला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय आयुर्वेदाची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा भरीव करून दिली आहे. आयुर्वेद इस्पितळ व्हावीत, आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर निर्माण व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे. आज गोव्यात धारगळ येथे उभारण्यात आलेले आरोग्य इस्पितळ व केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिलेले सहकार्य या जोरावरच येत्या काही दिवसांत रायबंदर येथे सरकारतर्फे आरोग्य संशोधन केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. पणजीतील इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा येथे जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त गोवा होमिओपॅथी मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा होमियोपॅथी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बिपीन साळकर, आयुष सेलचे उपसंचालक डॉ. मिनाल जोशी, आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, धारगळ येथे आयुष इस्पितळ उभारूनही आपल्याला उत्तम आयुर्वेद डॉक्टरांचा तुटवडा जाणवत आहे. आवश्यक मनुष्यबळासाठी केरळसारख्या राज्यातील डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. राज्यात आयुर्वेद क्षेत्रात चमकण्यासाठी युवा डॉक्टरांना भरपूर संधी आहेत, त्यादृष्टीने शिक्षण घेऊन लाभ घ्यायला हवा. गोवा हे सर्वच बाबतीत आता अग्रेसर होऊ पाहत असल्याने भविष्यात आयुर्वेदासाठीच गोवा हे देशात नंबर एकचे राज्य होऊ शकते. त्यामुळे युवा डॉक्टर व विद्यार्थ्यांनी केवळ प्रॅक्टीस यावरच अवलंबून न राहता आयुर्वेदातील विविध संधी शोधून त्यात नाव कमवावे. आयुष डॉक्टरांसाठी जगमान्यता असून, अशा डॉक्टरांसाठी स्वतंत्र आयुष विझा देण्याची सोयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध केल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. आयुष सेलचे उपसंचालक डॉ. जोशी यांनीही होमियोपॅथीचे महत्त्व सांगताना या क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींचा विशेष उल्लेख करून त्यांचे योगदान स्पष्ट केले. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी प्रत्येकाने होमियोपॅथीचे कार्य पुढे नेण्याचा निश्चय करावा, असे आवाहन केले. डॉ. गीता काकोडकर यांनीही आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत राज्यात आरोग्य सेवा ही उत्तम प्रकारे दिली जात असल्यानेच गोवा राज्याचे नाव आरोग्य क्षेत्रात उच्च स्थानी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरवातीला श्रेया भोसले यांनी कथ्थक नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात श्रेया भोसले यांच्या कलेचे कौतुक केले. श्रेया भोसले यांना मुख्यमंत्री सावंत यांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमात गोवा होमिओपॅथी मंडळाची नवीन वेबसाईट प्रसारीत करण्यात आली. डॉ. प्रतीक्षा कुंकळ्येकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मेर्लिन टेलीस यांनी आभार मानले.
सन्मानित केलेले होमियोपॅथी डॉक्टर असे…
जागतिक होमियोपॅथी दिनानिमित्त होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या डॉक्टरांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये डॉ. शेखर शेट्यो (चिखली), डॉ. इंदिरा नोरोन्हा (पणजी), डॉ. विजयालक्ष्मी देसाई (बाळ्ळी), डॉ. मार्लिन टेलिस (मडगाव), डॉ. निर्मला वळवतकर (मडगाव), डॉ. स्वाती देसाई (वाळपई), डॉ. डॉम्निक डिसोझा (कुडतरी), डॉ. पल्लवी काणेकर (साखळी), डॉ. रीना परब (फोंडा), डॉ. श्वेता गांधी (म्हापसा), डॉ. स्पंदन फळदेसाई (हळदोणा), डॉ. नारायण शिरोडकर, डॉ. मोहिनी देसाई, डॉ. साईश मडकईकर, अनुपा प्रभू यांचा समावेश होता.









