डॉ. रमा गर्गे यांचे प्रतिपादन
पणजी : चराचर सृष्टीची काळजी जसा परमेश्वर घेतो तद्वतच, आपल्या घरातील रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन, घरी येणाऱ्या समाजकार्यकर्त्यांची, सेवाभावी प्रचारकांची माता बनून वात्सल्याने त्यांचे ‘पालकत्व’ स्वीकारणाऱ्या समाजमातांची भूमिका राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात फार महत्त्वपूर्ण व अत्यावश्यक असते. गाजावाजा न करता अखंडपणे असे अप्रकट काम करणाऱ्या समाजमातांचे आदर्श समाजासमोर आणण्याचे सुषमा सुभाष वेलिंगकर स्मृति प्रतिष्ठानचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे उद्गार लेखिका तथा योगशास्त्रतज्ञ डॉ. रमा दत्तात्रय गर्गे (कोल्हापूर) यांनी काढले. कला व संस्कृती भवन,पाटो पणजीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सुषमा सुभाष वेलिंगकर स्मृती प्रतिष्ठान स्थापनेच्या समारोहात प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष वेलिंगकर, कार्यवाह सूर्यकांत गावस व ज्येष्ठ विश्वस्त पृथ्वीराज श्रॉफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त शैलेंद्र वेलिंगकर यांनी केले. स्व. सुषमा वेलिंगकर यांची व्यक्तिरेखा त्यांच्या निकटच्या श्यामल अवधुत कामत यांनी शब्दबद्ध करून मांडली. डॉ. रमा गर्गे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रतिष्ठानचे सांकेतिक उद्घाटन करण्यात आले. यानंतर ‘समाजमाता पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम झाला. या वर्षीचे तिन्ही पुरस्कार मरणोत्तर तत्वावर देण्यात आले. फोंडा-ओपा येथील स्व. मालिनी नारायण देसाई तथा अक्का वास्को येथील स्व. तिलोत्तमा विश्वनाथ आर्लेकर तथा माँ, व स्व. अन्नपूर्णा श्रीनिवास बखले तथा वहिनी अशा तिघींची निवड झाली.
स्व. अक्का देसाई यांचा परस्कार, त्यांच्या कनिष्ठ भगिनी कालिंदी (माई) गावकर यांनी, स्व. बखलेवहिनींचा पुरस्कार त्यांचे दीर रामचंद्र तथा बाबुराव बखले यानी तर स्व. माँ आर्लेकर यांचा पुरस्कार शुभदा कळंगुटकर यांनी स्वीकारला. यावेळी तिन्ही मानपत्रांचे क्रमश: वाचन, या सत्राच्या प्रमुख, समाजकार्यकर्त्या वैशाली आमोणकर यांनी केले. डॉ. रमा गर्गे यांच्या हस्ते पुरस्कार दिले गेले. या सर्व समाजमातांच्या वात्सल्याचा प्रत्यक्ष संघकार्यात अनुभव घेतलेले प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी त्यांच्या स्वभाव व योगदानाचे पैलू उलगडले. स्व. सुषमा वेलिंगकर यांच्या आजारात, घरी व हॉस्पिटलमध्ये घरच्या नात्याप्रमाणे सर्वतोपरी साहाय्यभूत ठरलेल्या व्यक्तींची ऋणनिर्देश-दखल घेण्याच्या ‘ऋणानुबंधन’ या सत्रात पुढील व्यक्तींच्या जिव्हाळ्याचा भेटवस्तु व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शमिता सुनिल सांतीनेसकर, दीपा चंदन आमोणकर, हेमा प्रभाकर कवळेकर, नीता ऊद्रेश्वर शेट्यो, सिद्धेश रमाकांत नाईक, निसार इक्बाल महालदार, ऊपेश मस्के, देवानंद नाईक, प्रभाकर कवळेकर, गोपाळ देसाई, लक्ष्मीकांत तथा बबन केरकर व बाल शौनक शंकरदास यांचा सन्मान डॉ. रमा गर्गे यांनी केला. यावेळी सूत्रनियंत्रण व संक्षिप्त परिचय, विश्वस्त गीता विशाल सिग्नापूरकर यांनी केला. त्यानंतर, प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमांची माहिती प्राचार्य दीपक आमोणकर यांनी दिली. महिला समुपदेशन केंद्राचे सांकेतिक उद्घाटन डॉ. रमा गर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. सूर्यकांत गावस यांनी आभार मानले. समाजकार्यकर्त्या ज्योती कृष्णराव बांदोडकर यांनी प्रमुख पाहुण्या डॉ. गर्गे यांचा सविस्तर परिचय करून दिला. लेखिका व शिक्षिका नीलांगी औदुंबर शिंदे यांनी स्व. सुषमा वेलिंगकर यांच्यावर रचलेले वैयक्तिक गीत राज्ञी नितीन फळदेसाई हीने सादर केल्यानंतर, डॉ. रमा गर्गे यांचे महिलांची पारंपरिक व आजची सामाजिक भूमिका यावर उद्बोधन झाले. प्रणय नाईक यांनी शांतीमंत्र सांगून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी सभागृह भरगच्च भरल्याने बाहेरही बसण्याची व क्रीनवर कार्यक्रम दिसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी केले.









