जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची नोडल अधिकाऱ्यांना सूचना : आतापासूनच आवश्यक साहित्याची पडताळणी करा
बेळगाव ; विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक अत्यंत पारदर्शकपणे आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे काम पार पाडावे. कोणत्याही परिस्थितीत गोंधळ निर्माण होऊ नये, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली. निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार काम करणे महत्त्वाचे आहे. आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, निवडणूक काळात वाहतूक व्यवस्था चांगल्याप्रकारे ठेवावी, जेणेकरून अधिकारी व कर्मचारी निवडणूक केंद्रांवर वेळेत पोहोचतील. त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. इव्हीएम वापरताना योग्यप्रकारे हाताळावे, कोणाचीही तक्रार आल्यास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस आणावे आणि त्या तक्रारीचे तेथेच निवारण करावे, असेही स्पष्ट केले. निवडणुकीसाठी यापूर्वीच सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आवश्यक असलेले निवडणुकीसंदर्भातील सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोणतीही उणीव असल्यास त्याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आता मतदान आणि मतमोजणीचा दिवस जसा जवळ येईल, तसा कामाचा ताण प्रत्येकावर वाढत जाणार आहे. मात्र ताण न घेता व कोणताही गोंधळ न घालता ही निवडणूक पार पाडावी, असे त्यांनी सांगितले. आतापासूनच आवश्यक साहित्याची पडताळणी करा आणि यादी तयार करून वरिष्ठांना द्यावी. वाहतूक व्यवस्थेबरोबरच नाश्ता, जेवण याची व्यवस्था उपलब्ध करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. य् ाा बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी के. टी. शांतला, जिल्हा पंचायतीचे अधिकारी परशुराम दुंडगुंटी, लक्ष्मण बबली, राजश्री जैनापुरे, निस्सार अहमद, प्रीतम नसलापुरे, श्रीशैल कंकणवाडी, रवि बंगारपण्णावर, गुरुनाथ कडबूर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडून इशारा
विधानसभा निवडणुकीच्या कोणत्याही कामासाठी 18 वर्षाखालील मुलांचा प्रचारासाठी किंवा इतर कामासाठी वापर करू नये, अन्यथा संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.









