पुणे / प्रतिनिधी :
यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहणार असल्याने, जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या कालावधीत पाऊस हा सरारीपेक्षा कमी राहण्याचा दीर्घकालीन अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे.
स्कायमेट ही खासगी हवामान संस्था असून, दरवर्षी ती मान्सूनचा अंदाज वर्तवित असते. संस्थेचे संचालक जतीन सिंह यांनी सोमवारी जाहीर केलेल्या दीर्घकालीन अहवालानुसार, चार महिन्याच्या कालावधीत दरवर्षी साधारणपणे 868.8 मिमी इतका पाऊस देशभरात होत असतो. यंदा मात्र तो 816.5 मिमी राहत सरासरीच्या 94 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमी जास्तीची शक्यता आहे. ला निनोच्या प्रभावामुळे गेले चार मान्सून हे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. यावर्षी मात्र ला निनोचा प्रभाव ओसरला असून, एल निनोचा प्रभाव जाणवणार आहे. सध्या एन्सो तसेच इंडियन ओशन डायपोल तटस्थ असून, एल निनो वाढणार आहे तसेच मान्सूनदरम्यान त्याचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. एका अभ्यासानुसार जेव्हा जेव्हा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहिला आहे, त्यावर्षी देशात पावसाची कमी नोंद झाली आहे .
उत्तर-मध्य भारतात पाऊस कमी
या अहवालानुसार, देशाच्या उत्तर तसेच मध्य भागात यंदा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. त्यातही गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात जुलै व ऑगस्ट या महिन्यात पावसाने ओढ दिलेली असेल, तर मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट ते सप्टेबर या महिन्यात पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणाच्या भागात सरासरीपेक्षा पाऊस कमी राहील.
दुसऱया टप्प्यात पाऊस कमी
स्कायमेटच्या अंदाजानुसार मान्सूनच्या दुसऱ्या ऑगस्ट व सप्टेंबर टप्प्यात पाऊस कमी राहणार आहे. यात जून महिन्यात सरासरीच्या 99 टक्के, जुलै 95, ऑगस्ट 92, तर सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 90 टक्के पाऊस होणार आहे.
हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजाची प्रतीक्षा
भारतीय हवामान विभाग दरवर्षी एप्रिलच्या मध्यावर मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर करते. अद्याप मान्सूनविषयी हवामान विभागाने कोणतेही भाष्य केलेले नाही. लवकरच हवामान विभाग मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.









