पहिल्या दिवशी 50 जणांविरुद्ध कारवाई
बेळगाव ; जिल्ह्यात नशेत वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या सूचनेवरून रविवारी ही मोहीम राबविण्यात आली असून पहिल्या दिवशी 50 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. नशेत वाहने चालविल्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्याची सूचना जिल्हा पोलीसप्रमुखांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. या सूचनेवरून वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात वाहने अडवून चालकांची तपासणी करण्यात आली. रविवारी 50 जणांविरुद्ध कारवाई झाली असून यापुढेही तपासणी व कारवाईची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले. पोलिसांच्या तपासणी मोहिमेमुळे नशेत वाहने चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.









