पोलीस आयुक्तांची सूचना : शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱयांनी घेतली भेट
बेळगाव : येत्या 22 एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांनी हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी शिवजयंती उत्सव मंडळांनी यावर्षी शिवजयंती 24 मे रोजी साजरी करावी, अशी सूचना केली. निवडणूक आचारसंहिता आल्याने यावर्षीची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक रात्री लवकर समाप्त करणे बंधनकारक ठरणार आहे. जर 24 एप्रिल रोजी मिरवणूक काढली तर पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकाऱयांनी योग्य ती खबरदारी घ्यायची आहे. शिवजयंती साजरी करताना कायदा व सुव्यवस्था राखावी, चित्ररथ मिरवणुकीत डीजेला परवानगी नाही, सर्व मंडळांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. फलक, बॅनरची परवानगी आवश्यक आहे. त्यावरील मजकुर पाहूनच परवानगी देण्यात येईल, देखावा राजकीय नसावा. डीजेऐवजी सामाजिक देखावे, प्रबोधन, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम घेत सामाजिक दृष्टिकोनातून काम करावे, आदी सूचना आयुक्तांनी केल्या. यावर्षी शिवजयंतीला आचारसंहितेमुळे मर्यादा येणार आहेत. त्यामुळे चित्ररथ मंडळांना 24 मे हीच तारीख सोयीची होणार आहे, असे चित्र स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य नवीन पिढीसमोर आणण्याचे काम चित्ररथांतून होत असते. रात्री 10 च्या आत मिरवणुका बंद केल्यास वेळेच्या मर्यादेमुळे तो उद्देश असफल होणार असल्याने शिवजयंती उत्सवावर परिणाम घडू शकतो. त्यामुळे 24 मे ही तारीख चित्ररथ तयारीसाठी व पूर्ण वेळ कला सादरीकरणासाठी उपयुक्त असल्याचे सर्व मंडळांचे मत असल्याने आयुक्तांच्या 24 मे या तारखेला सर्वांनी संमती दर्शविली. यावेळी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, संतोष कणेरी, मेघन लंगरकांडे, प्रसाद मोरे, जे. बी. शहापूरकर, अरुण पाटील, आदित्य पाटील, विजय जाधव, रवी कलघटगी, विनायक बावडेकर आदी उपस्थित होते.









