हजारो भक्तांची उपस्थिती : तीनदिवसीय यात्रेची उत्साहात सांगता
किणये : मुचंडी गावचे जागृत ग्रामदैवत सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा मोठय़ा उत्साहात झाली. यात्रेनिमित्त शुक्रवारी सायंकाळी हर हर महादेवच्या गजरात इंगळय़ांचा कार्यक्रम झाला. यावेळी हजारो भक्तांची उपस्थिती होती. चार दिवस चाललेल्या या यात्रोत्सवाची सोमवारी सांगता झाली. तालुक्यातील भक्तांनी देवदर्शनाचा लाभ घेतला. गुरुवारपासून यात्रेला सुरुवात झाली होती. बुधवारी सायंकाळी इंगळय़ांसाठी लागणारी लाकडे बैलगाडीतून आणण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी गावात आंबिल गाडय़ांची मिरवणूक झाली. मिरवणुकीत गुलालाची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस पार पडला. सकाळी सिद्धेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी मिरवणूक निघाली. सायंकाळी मंदिरासमोर इंगळय़ांचा भव्य कार्यक्रम झाला. मुचंडीतील सिद्धेश्वर देवस्थान जागृत असल्यामुळे इंगळय़ांमधून जाण्यासाठी हजारो भक्तांनी दिवसभर कडक उपवास केला होता. सायंकाळी पुजारी, हक्कदार, देवस्थान कमिटी पदाधिकारी आदींच्या हस्ते इंगळय़ांचे पूजन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि हर हर महादेव… असा जयघोष करत भक्त इंगळय़ांमधून धावू लागले. हा सोहळा पाहण्यासाठी सिद्धेश्वर डोंगर पायथ्यावर भक्तांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध प्रकारची खेळणी, खाऊचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.









