बसस्थानकातील चित्र, विक्रेत्यांचा विळखा : प्रवाशांची गैरसोय, कारवाईची मागणी
बेळगाव ; शहरातील स्मार्ट रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. विशेषत: फूटपाथ विक्रेत्यांनी घेरले आहेत. त्यामुळे शहरातील रहदारीवर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: पादचारी रस्त्यावर आणि विक्रेते फूटपाथवर असे चित्र पहायला मिळत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या सभोवताली फूटपाथ विक्रेत्यांनी घेरले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. मध्यवर्ती बसस्थानकात हजारो प्रवाशांची दररोज ये-जा असते. दरम्यान, सुसज्ज बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र बसस्थानकाच्या समोर असलेल्या फूटपाथवर किरकोळ विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे फूटपाथ पादचाऱ्यांसाठी की, विक्रेत्यांसाठी? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. शहरातील रस्ते, फूटपाथ आणि इतर विकास साधण्यात आला आहे. मात्र फूटपाथवर अतिक्रमण वाढल्याने शहराच्या सैंदर्याला आणि रहदारीलादेखील बाधा पोहोचू लागली आहे. विशेषत: फूटपाथवर फळ, भाजी, चहा, थंडपेय आणि फुल विक्रेत्यांनी व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे फूटपाथ झाकले गेले आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना फुटपाथ सोडून रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. शहरातील फोर्ट रोड, मध्यवर्ती बसस्थानक, एपीएमसी रोड, आंबेडकर रोड, काकतीवेस आदी ठिकाणी असलेल्या फूटपाथवर विक्रेत्यांचा विळखा पडला आहे. लहान विक्रेत्यांबरोबर मोठ्या विक्रेत्यांनीदेखील अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांनी जावे कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाढत्या उन्हामुळे बसस्थानक परिसरात असलेल्या फूटपाथ उसाचा रस, शीतपेये विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. आधीच बसस्थानक परिसरात अरुंद रस्ता आहे. त्यातच फूटपाथवर विक्रेत्यांनी गर्दी केल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत.
लवकरच कारवाई करू!
शहरातील अतिक्रमित फुटपाथ यापूर्वी मोकळे करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा फुटपाथवर व्यावसायिकांचे अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अतिक्रमण झालेले फुटपाथ पुन्हा मोकळे करण्यासाठी लवकरच कारवाई केली जाणार आहे.
-रुद्रेश घाळी, मनपा आयुक्त









