तृणमूल काँग्रेस, भाकपचीही तीच गत : निवडणूक आयोगाकडून घोषणा : ‘आप’ आता राष्ट्रीय पक्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय या पक्षांचा ‘राष्ट्रीय’ दर्जा काढून घेतला आहे. या तिन्ही पक्षांची मतसंख्या देशभरात 6 टक्क्मयांहून कमी झाल्यामुळे त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमवावा लागला आहे. यापूर्वी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाकडून (बसप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला होता. दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी संध्याकाळी राष्ट्रीय पक्षांच्या दर्जासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यानुसार निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस (टीएमसी), सीपीआय (भाकप) आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आता ‘राष्ट्रीय’ नसल्याचे स्पष्ट केले. याशिवाय, प्रादेशिक पक्षांमध्ये निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेशमधील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) यांच्याकडून प्रादेशिक पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. तसेच काही राज्यांमध्ये पक्षांना ‘प्रादेशिक’ दर्जा देण्यात आला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), मेघालयमध्ये तृणमूल काँग्रेस आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी, त्रिपुरामधील टिपरा मोथा यांना मान्यताप्राप्त राज्य राजकीय पक्षांचा दर्जा देण्यात आला आहे.
…हा तर चमत्कार : अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला हा दर्जा मिळाल्यावर पक्षाच्या नेत्यांनी ट्विट करून आनंद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. ‘इतक्या कमी कालावधीमध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही’, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. देशातील कोट्यावधी जनतेने आपल्याला इथपर्यंत पोहोचवले आहे. लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आज लोकांनी आमच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. परमेश्वराने आम्हाला ही जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी आशीर्वाद द्यावेत’ असेही ते पुढे म्हणाले.
‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष
निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये 6 टक्के मते मिळणे आवश्यक असते. ‘आप’ने दिल्ली, पंजाब आणि गोवा या तीन राज्यांमध्ये आधीच 6 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. राष्ट्रीय पक्षासाठी ‘आप’ला गुजरात किंवा हिमाचलमध्ये 6 टक्के पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक होते. गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला 13 टक्के मते मिळाली आहेत. अशा स्थितीत तो राष्ट्रीय पक्ष बनला आहे.
राष्ट्रीय दर्जासाठी ‘आप’ न्यायालयात
काही दिवसांपूर्वीच आम आदमी पार्टीने पक्ष म्हणून मान्यता मिळावी यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या विलंबामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. कर्नाटकमधील आम आदमी पक्षाचे संयोजक पृथ्वी रे•ाr यांनी दाखल केलेल्या याचिकेत आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी सर्व निकष पूर्ण करत असल्याचे स्पष्ट केल होते. परंतु निवडणूक आयोग आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्रदान करण्यास चालढकल करत असल्याचा युक्तिवादही केला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने यासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
राष्ट्रीय पक्षासाठी नियम-अटी
कोणत्याही राजकीय पक्षाला ‘राष्ट्रीय’ दर्जा मिळण्यासाठी खालील तीनपैकी किमान एक निकष पूर्ण करणे आवश्यक असते.
1) पक्षाला किमान चार राज्यांत 6 टक्के मते मिळालेली असावीत.
2) लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2 टक्के जागा किमान तीन राज्यांतून मिळाव्यात.
3) पक्षाला चार राज्यात प्रादेशिक पक्षाचा दर्जा प्राप्त होणे अपेक्षित.
राष्ट्रीय पक्षाचे फायदे
राष्ट्रीय पक्ष आपले चिन्ह किंवा निवडणूक चिन्ह देशभर सुरक्षित ठेवू शकतात. निवडणूक प्रचारात राष्ट्रीय पक्ष जास्तीत जास्त 40 स्टार प्रचारक निश्चित करू शकतात. सदर स्टार प्रचारकांचा प्रवास खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जात नाही. राष्ट्रीय पक्षांना पक्षाध्यक्ष आणि पक्ष कार्यालयासाठी राजधानी दिल्लीत अनुदानित दरात सरकारी बंगला मिळतो. राष्ट्रीय पक्षांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ऑल इंडिया रेडिओवर प्रसारणासाठी ब्रॉडकास्ट आणि टेलिकास्ट बँड मिळतात. राष्ट्रीय पक्षांना उमेदवारी दाखल करण्यासाठी फक्त एका प्रस्तावकाची गरज असते. इतर पक्षांना 2 प्रस्तावकांची आवश्यकता असते. तर नवीन पक्ष आणि अपक्षांना 5 प्रस्तावकांची आवश्यकता असते.
राजकीय पक्षांची स्थिती
भारतातील राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते. भारतात कोणीही निवडणूक लढवू शकतो आणि स्वत:चा राजकीय पक्ष बनवू शकतो. राजकीय पक्ष हा समान विचारधारा आणि राजकीय दृष्टिकोनावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा एकत्रित गट असतो. पक्ष आपले उमेदवार निवडणुकीत उभे करतात, त्यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला करतात आणि मग त्यांच्या विचारसरणीनुसार कामे करण्याचा प्रयत्न करतात. भारतात एकूण 2,858 राजकीय पक्ष असून त्यांच्या तीन श्रेणी आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि मान्यता नसलेले पक्ष असे तीन गट केलेले आहेत.









