वृत्तसंस्था/ जमशेदपूर
झारखंडमधील जमशेदपूर येथे ध्वजावरून निर्माण झालेल्या वादानंतर तणाव निर्माण झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी काही भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच इंटरनेट बंद करण्यात आले आहे. तणाव टाळण्यासाठी सुरक्षा दलांनी सोमवारी सकाळी शास्त्रीनगर ब्लॉकमध्ये संचलन केले. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत 60 जणांना अटक केली आहे.
जमशेदपूरमधील शास्त्रीनगर भागात रविवारी रात्री उशिरा वातावरण पुन्हा बिघडले. दोन्ही गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. तणाव वाढल्यानंतर एका गटाने पोलिसांवरही दगडफेक केली. दगडफेकीत ट्रॅफिक डीएसपी कमल किशोर यांच्यासह अनेक पोलीस जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही हवेत गोळीबार केला. पोलिसांनी सुमारे 8 राउंड फायर केले. जमशेदपूरमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी भाजप नेते अभय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तसेच 120 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही समाजकंटकांनी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.









