वृत्तसंस्था/ धर्मशाला
आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी सोमवारी एका मुलाचे चुंबन घेतल्याबद्दल माफी मागितली. ‘आपल्या कृतीमुळे मुलाच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो’ असे निवेदन त्यांनी जारी केले. ‘मी जगभरातील माझ्या सर्व समर्थकांचीही माफी मागतो’, असे दलाई लामा यांनी निवेदनात म्हटले आहे.
दलाई लामा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक मूल धर्मगुरुंकडून आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. याचदरम्यान दलाई लामा यांनी मुलाच्या ओठांवर चुंबन घेतल्याचे दिसून येत आहे. सदर व्हिडिओची वेळ आणि घटना कुठे घडली, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ सर्वदूर पोहोचल्यानंतर दलाई लामांनी या घटनेवर दिलगिरी व्यक्त केली आहे. दलाई लामा अनेकदा सहजपणाने किंवा मजेदार पद्धतीने लोकांवर खोड्या करतात. अनेकवेळा असे प्रकार सार्वजनिक ठिकाणी आणि व्हिडिओसमोरही होतात. मात्र, त्यांनी या घटनेबद्दल माफी मागितल्याचे अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.









