लंडनला जाणारे विमान 4 तासांनंतर पुन्हा दिल्लीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विमान प्रवासादरम्यान प्रवाशाने केलेल्या गैरवर्तनामुळे एअर इंडियाच्या विमानाला सोमवारी सकाळी विमानतळावर परतावे लागले. दिल्लीहून लंडनला जाणाऱया एआय-111 फ्लाईटमधील एका प्रवाशाने क्रू मेंबर्ससोबत भांडण सुरू केल्यानंतर मारहाणही केली. या हल्ल्यात दोन क्रू मेंबर्स जखमी झाल्याचे एअरलाईन्सच्या एका अधिकाऱयाने सांगितले.
विमान कंपनीने सोमवारी सकाळी 6.30 वाजता लंडनच्या हिथ्रोसाठी उड्डाण घेतल्याचे सांगितले. टेकऑफ केल्यानंतर प्रवाशाने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. विमानातील कर्मचाऱयांनी त्याला वारंवार ताकीद दिली पण प्रवाशाने गैरवर्तन सुरूच ठेवले. त्याने दोन केबिन क्रू सदस्यांनाही जखमी केले. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता विमान दिल्लीला परतले.
विमान कंपनीने सदर प्रवाशाविरुद्ध दिल्ली विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपींना ताब्यात घेतले आहे. जसकीरत सिंग (25 वर्षे) असे संबंधिताचे नाव असून तो पंजाबमधील कपूरथला येथील रहिवासी आहे. तो आपल्या आई-वडिलांसोबत लंडनला जात होता. या संपूर्ण घटनेबाबत उर्वरित प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाईन्सने दिलगिरी व्यक्त केली. तसेच सदर विमानफेरीची वेळ बदलून सर्व प्रवाशांना लंडनच्या दिशेने मार्गस्थ केले.









