आयपीएल 16 ः सामनावीर पूरन, स्टोइनिस यांची जलद अर्धशतके, कोहली, डु प्लेसिस, मॅक्सवेल यांची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
शेवटच्या चेंडूपर्यंत चित्तथरारक ठरलेल्या आयपीएलमधील साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरवर केवळ एका गडय़ाने मात करीत तिसरा विजय नोंदवला. या मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवणाऱया निकोलस पूरनला सामनावीराचा बहुमान मिळविला. त्याने केवळ 15 चेंडूत अर्धशतकी मजल मारली. आयपीएलमधील हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, फॅफ डु प्लेसिस यांनी नोंदवलेली अर्धशतके मात्र वाया गेली. या सामन्यात 40 षटकांत 425 धावांची बरसात झाली.

लखनौ सुपरजायंट्सने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी दिली. आरसीबीने कोहली, मॅक्सवेल व डु प्लेसिस यांच्या अर्धशतकाच्या बळावर 20 षटकांत 2 बाद 212 अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्यानंतर स्टोइनिस, निकोलस पूरन यांनी नोंदवलेली जलद अर्धशतके आणि आयुष बदोनीने केलेल्या 24 चेंडूतील 30 धावांच्या बळावर लखनौने 20 षटकांत 9 बाद 213 धावा जमवित एका गडय़ाने रोमांचक विजय मिळविला. लखनौची सुरुवात खराब झाली होती. 3 बाद 23 अशा स्थितीनंतर स्टोइनिस व राहुल यांनी डाव सावरताना 40 चेंडूत 76 धावांची भागीदारी करीत आव्हान जिवंत ठेवले. स्टोइनिस 30 चेंडूत 65 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार, 5 षटकार मारले. पूरनला बदोनीकडून बऱयापैकी साथ मिळाली. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी 35 चेंडूत 84 धावा झोडपल्या. उत्तुंग फटका मारताना पूरन झेलबाद झाला. त्याने केवळ 19 चेंडूत 4 चौकार, 7 षटकारांची आतषबाजी करीत 62 धावांचा पाऊस पाडला. नंतर बदोनी दुर्दैवाने फटका मारल्यानंतर बॅट यष्टींना लागल्याने स्वयंचीत झाला. 206 धावसंख्येवर तो बाद झाला. नंतर मार्क वुड, जयदेव उनादकटही बाद झाले. बिश्नोई व अवेश खान या शेवटच्या जोडीने एकेरी धावा घेत संघाला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. हा चेंडू टाकण्याआधी हर्षल पटेलने बिश्नोईला नॉनस्ट्रायकर एंडकडे धावचीत करण्याचा प्रयत्न केला. तो हुकल्यानंतर त्याला पुन्हा धावचीत केले. पण पंचांनी त्याला नाबाद ठरविले आणि शेवटच्या चेंडूवर बाय धाव घेत लखनौचा विजय साकार केला. आरसीबीच्या सिराज व वेन पार्नेल यांनी प्रत्येकी 3, हर्षल पटेलने 2 बळी टिपले.

कोहली, डु प्लेसिसची फटकेबाजी
फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर कोहली व डु प्लेसिस या आरसीबीच्या सलामीवीरांनी पॉवरप्लेच्या खेळात जोरदार फटकेबाजी करीत संघाला 11.3 षटकांत 96 धावांची सलामी दिली. यात कोहली जास्त आक्रमक खेळत होता. डु प्लेसिसने 46 चेंडूत नाबाद 79 धावा फटकावल्या तर कोहलीने 44 चेंडूत 61 धावा झोडपल्या. प्रारंभी त्यानेच आक्रमक हल्ला करीत लखनौचा गोलंदाजांचा समाचार घेतला. सावध सुरुवातीनंतर कोहलीने अवेश खानला सलग दोन चेंडूवर षटकार, चौकार ठोकत आक्रमण सुरू केले. अवेशनेच टाकलेल्या चौथ्या षटकात कोहलीने सलग तीन चौकार ठोकले. आत्मविश्वास बळावलेल्या कोहलीने नंतर कृणाल पंडय़ाला पुलचा षटकार ठोकला. पुढच्या षटकात मार्क वुडला सरळ चौकार मारल्यानंतर मिडविकेटच्या दिशेने पुलचा षटकार मारला. बिश्नोईच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत कोहलीने अर्धशतक पूर्ण केले.

दुय्यम भूमिका घेणाऱया कर्णधार डु प्लेसिसने खराब चेंडूची प्रतीक्षा करीत धावफलक हलता ठेवला. 12 व्या षटकात कोहलीला अमित मिश्राने स्क्वेअरलेगला स्टोइनिसकरवी झेलबाद केले. नंतर आलेल्या मॅक्सवेलने ओघ कायम राखत तुफान फटकेबाजी केली आणि केवळ 29 चेंडूतच 59 धावा झोडपल्या. आल्यापासूनच त्याने गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढविला. 15 व्या षटकात डु प्लेसिसने बिश्नोईला तीन षटकार ठोकले. त्याने वुडच्या डोक्यावरून उंच फटका मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी चौकार, षटकारांची आतषबाजीच सुरू केली होती. उनादकटच्या 18 व्या षटकात त्यांनी 23 धावा फटकावल्या तर मॅक्सवेलने अवेशला दोन षटकार ठोकत 24 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी केवळ 44 चेंडूतच शतकी भागीदारी पूर्ण केली. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलला वुडने त्रिफळाचीत केले. मॅक्सवेलने आपल्या खेळीत 3 चौकार, 6 षटकार मारले. वुड व अमित मिश्रा या दोघांनाच एकेक बळी मिळाला.
संक्षिप्त धावफलक ः रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकांत 2 बाद 212 ः कोहली 61 (44 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), डु प्लेसिस 79 (46 चेंडूत 5 चौकार, 5 षटकार), मॅक्सवेल 59 (29 चेंडूत 3 चौकार, 6 षटकार), दिनेश कार्तिक नाबाद 1, अवांतर 12. गोलंदाजी ः अमित मिश्रा 1-18, मार्क वुड 1-32.
लखनौ सुपरजायंट्स 20 षटकांत 9 बाद 213 ः केएल राहुल 18 (20 चेंडूत 1 चौकार), स्टोइनिस 65 (30 चेंडूत 6 चौकार, 5 षटकार), निकोलस पूरन 62 (19 चेंडूत 4 चौकार, 7 षटकार), आयुष बदोनी 30 (24 चेंडूत 4 चौकार), उनादकट 9, बिश्नोई नाबाद 3, अवांतर 16. गोलंदाजी ः सिराज 3-22, पार्नेल 3-41, हर्षल पटेल 2-48, कर्ण शर्मा 1-48.








