सेन्सेक्स 13 अंकांनी तेजीत, रिअल्टी, ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्या नफ्यात
मुंबई
: आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार काहीसा तेजीसमवेत बंद होण्यात यशस्वी झाला. रिअल्टी आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांनी बाजाराला आधार दिला.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 13 अंकांनी वधारत 59,846 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 24 अंकांनी वाढत 17,624 अंकांवर बंद झाला. ऑटो, आयटी आणि धातू क्षेत्राचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झालेले पहायला मिळाले. मिडकॅप आणि
स्मॉलकॅपमधील समभागांमध्ये खरेदीचा माहौल दिसून आला. तर बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील समभागांमध्ये दबावाचे वातावरण पहायला मिळाले. टाटा मोटर्स, ओएनजीसी, ग्रेसीम इंडस्ट्रीज, अदानी एंटरप्रायझेस आणि विप्रो या निफ्टी निर्देशांकातील तेजी राखणाऱ्या कंपन्या होत्या. या तुलनेमध्ये बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स, एचयुएल, एशियन पेंट्स आणि इंडसइंड बँक हे समभाग नुकसानीसह बंद झाले होते. रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक 4 टक्के इतक्या वाढीसह बंद झालेला पहायला मिळाला.
ऑटो, ऊर्जा आणि तेल आणि वायू निर्देशांक 1 टक्का इतका वाढत बंद झाला. रसायन क्षेत्रात कार्यरत असणारा निओ जैन केमिकल्सचा समभाग शेअरबाजारात सोमवारी 6 टक्के इतका वाढलेला दिसून आला. सदरची कंपनी जागतिक स्तरावरती प्रसिद्ध असणाऱ्या एका कंपनीसोबत भागीदारी करणार असल्याचे समजताच समभागाने वरीलप्रमाणे तेजी राखली होती. बांधकाम क्षेत्रातील कंपनी गोदरेज प्रॉपर्टीचा समभाग सोमवारी सर्वाधिक 8 टक्के इतका वाढला होता. चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीच्या घरविक्रीमध्ये जवळपास 19 टक्क्यांची वाढ दर्शविली गेली होती. याचाच परिणाम कंपनीचा समभाग वाढण्यात दिसून आला.
जागतिक बाजाराचा विचार करता अमेरिका आणि युरोपातील बाजार तेजीसमवेत कार्यरत होते. अमेरिकेतील नॅसडॅक निर्देशांक 91 अंकांनी तेजीत होता. आशियाई बाजारात मिश्र स्वरुपाचा कल दिसून आला. निक्की 115 अंकांनी, हँगसेंग 56 अंकांनी, कोस्पी 21 अंकांनी आणि सेट कम्पोझिट 16 अंकांनी वधारत व्यवहार करत होते.









