इराकपेक्षा दुप्पट आयातीचे प्रमाण : भारत तिसरा मोठा देश
वृत्तसंस्था/ मुंबई
रशियातून भारताने मार्च महिन्यात प्रतिदिन 16.4 लाख बॅरल इतके कच्चे तेल आयात केले होते. सदरची आयात ही तेल पुरवठादार देश इराकपेक्षा दुप्पट असल्याचे सांगितले जात आहे. रशिया हा देश कच्च्या तेलाच्या बाबतीत सलग सहाव्यांदा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे. या कच्च्या तेलाचे रुपांतर आयातदार देश पेट्रोल व डिझेलमध्ये रुपांतरीत करत असतात.
आयातीतील वाटा वाढला
फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन यांच्यात संघर्ष सुरु होण्याआधी मात्र 1 टक्का असणारा आयातीचा वाटा आता मार्चमध्ये 34 टक्के इतका वाढला आहे. दरदिवशी 16 लाख बॅरल कच्चे तेल भारतात येत असल्याचे समजते.
जगातला तिसरा सर्वात मोठा देश
या योगे भारत हा आता जगातला तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश बनला आहे. इराकमधून मार्चमध्ये 0.8 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतके तेल आयात करण्यात आले होते. या दृष्टीने पाहता रशियातून दुप्पट तेलाची आयात भारताने केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यानंतर भारत हा तिसरा कच्चे तेल आयात करणारा देश बनला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध लादले हेते. ज्यानंतर रशियाने तेलावर सवलत ऑफर लागू केली आणि ज्याचा फायदा भारताने उठवला.









