एनएचआरसी पथक प्रमुखांची टिप्पणी ः ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर आक्षेप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या शोभायात्रांदरम्यान झालेल्या हिंसेनंतर ममता बॅनर्जी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) पथकाने हिंसाप्रभावित भागांचा दौरा केला आहे. एनएचआरसीच्या सत्यशोधन समितीने ममता बॅनर्जी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. ममता बॅनर्जी सरकारचे प्रशासकीय अपयश या हिंसेसाठी जबाबदार आहे. बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पाहता केवळ देवच या राज्याला वाचवू शकतो असे उद्गार समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरसिंह रेड्डी यांनी काढले आहेत.
शोभायात्रांवर हल्ले झाले आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शोभायात्रा शांततेत सुरू झाल्या होत्या. काही भागांमध्ये पोलीस तैनात होते. समाजकंटकांनी दगडफेक सुरू करताच पोलीस तेथून पूर्णपणे हटले. काही भागांमध्ये बळजबरीने घुसून समाजकंटकांनी लोकांच्या घरांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमी साजरी करणाऱयांना ‘ते’ असे संबोधिले होते. ते आणि आम्ही अशी विभागणी लोकशाहीत योग्य नसल्याचे नरसिंह रेड्डी यांनी ममता बॅनर्जी यांना सुनावले आहे.
दोषींऐवजी पीडितांवर कारवाई
बंगालमधील हिंसा ही पूर्णपणे प्रशासकीय अपयशाचे उदाहरण आहे. संवेदनशील सरकार दोषींवर कारवाई करण्यास विलंब करत नाही, परंतु बंगालमध्ये याच्या उलट पीडितांवर कारवाई झाली आहे. येथील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बघता केवळ देवच या राज्याला वाचवू शकतो असे रेड्डी यांनी म्हटले आहे.
‘तुम्ही आणि आम्ही’ का?
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अपयशामुळेच हावडा अन् हुगळीत हिंसा झाली. ‘तुम्ही कराल तर आम्ही ही करणार’ अशी भूमिका राज्याच्या मुख्यमंत्री कशा घेऊ शकतात? मुख्यमंत्रीच समाजात फूट पाडत आहेत. मुख्यमंत्र्यांनी रामनवमी साजरी करणाऱयांना ‘तुम्ही’ आणि उर्वरित समाजाला ‘आम्ही’ ठरवत आहेत असा आरोप निवृत्त न्यायाधीशांनी केला आहे.









