बायथाखोल – बोरी येथील सर्कलजवळील दुर्घटना : अग्निशामक दलाचे गॅसगळतीवर वेळीच नियंत्रण
फोंडा : कुंडईहून बोरीकडे जाणारा सीएनजी गॅस सिलींडरवाहू ट्रक बायथाखोल बोरी सर्कलजवळ रस्त्याच्याकडेला उलटला. ही घटना काल रविवारी पहाटे 4 वा. सुमारास घडली. ट्रक कलंडल्यानंतर सिलींडरमधून होणाऱ्या गॅसगळतीवर फोंडा अग्निशामक दलाने वेळीच नियंत्रण ठेवत महत्वाचे मदतकार्य केल्याने मोठा अनर्थ टळला. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडई येथील कंपनीतून एमएच 09 एफएल 7527 क्रमांकाचा सुमारे 600 किलो सीएनजी गॅस साठ्याने भरलेला ट्रक बोरी येथील पेट्रोलपंपवर डिलीवरी देण्यासाठी निघाला होता. नियोजित स्थळावर पोचण्याच्या केवळ 100 मिटर अंतरावर असताना ही घटना घडली. बायथाखोल बोरी सर्कलच्या धोकादायक वळणावर ट्रकचे स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा गेला आणि ट्रक रत्स्याच्या कडेला कलंडला. गॅसवाहू ट्रक कलंडल्याची माहिती मिळताच फोंडा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन शर्थीच्या प्रयत्नानंतर परिस्थिती आटोक्यात आणली.
फोंडा अग्निशामक दलाचे महत्वाचे मदतकार्य
ट्रक कलंडल्यानंतर गॅसच्या एका कम्पार्टमेंटमधील गॅस सिलींडरला गळती लागलेली आढळली. त्यानंतर सुरक्षितरित्या हळूहळू सर्व कम्पार्टमेंटमधून गॅस हवेत सोडून देण्यात आला. गॅस पसरू नये यासाठी अग्निशामक दलाकडून फोमचा मारा ट्रकवर करण्यात आला. गॅस संपर्कात कोणी येऊ नये याची दक्षता घेताना बोरी बायथाखोल सर्कलजवळील सर्व वाहतूक सुमारे 100 मिटर अंतरावरच रोखून धरून पुर्णत: बंद करण्यात आली होती. तसेच यावेळी मोबाईल फोनही बंद करण्याचे आदेश अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. पहाटे 6.30 वा. पर्यंत सर्व परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. पहाटे मार्गक्रमण करणारी अवजड वाहने व मासळीवाहू ट्रक काहीवेळ अडकून पडले होते. फोंडा अग्निशामक दलाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर, स्टेशन अधिकारी सुशील मोरजकर यांनी महत्त्वाचे मदतकार्य केले. तसेच गोवा नॅचरल गॅसचे आपत्कालीन सेवेचे सदस्य घटनास्थळी हजर झाले होते. सहाय्यक उपनिरीक्षक रोहिदास भोमकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.