फुकटचे गिफ्ट पडतेय महागात : राज्यात एका वर्षात अडीच हजार गुन्ह्यांची नोंद, बेअब्रूच्या भीतीने एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ
बेळगाव : सायबर गुन्हेगारांचा उपद्रव वाढता आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी आर्थिक गुन्हेगारी एकीकडे तर दुसरीकडे महिला आणि मुलींना लक्ष्य बनवून ब्लॅकमेल करण्यात येत आहे. बेळगावसह संपूर्ण जिल्ह्यात असे गुन्हे वाढले असून शहर व जिल्हा सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सोशल मीडियावर महिला व सुंदर मुलींचे फोटो अपलोड करून सावजांना जाळ्यात ओढणाऱ्या गुन्हेगारांचा उपद्रव वाढला आहे. फेसबुकवर एखाद्या सुंदर तरुणीचा फोटो अपलोड केला जातो. अनेकांना प्रेंडरिक्वेस्ट पाठवून मैत्री केली जाते. मैत्रीचे ऊपांतर चॅटिंगमध्ये होते. त्यानंतर अश्लील फोटो व व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात आहे.
महिला व लहान मुलांवरील सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, केरळ, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेशसह 28 राज्यांत सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सायबर क्राईम विभाग असे गुन्हे रोखण्यासाठी सतत कार्यरत असते. सोशल मीडियावर महिला व तरुणींची ओळख करून घेऊन नंतरच्या काळात त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्याही घटना कमी नाहीत. एका पाहणीनुसार देशभरात रोज 170 हून अधिक महिला व मुलांवरील सायबर गुन्हे घडतात. यापैकी कर्नाटकात रोज किमान 7 गुन्ह्यांची नोंद होते. राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलमधील माहितीनुसार 1 जानेवारी 2022 पासून 31 डिसेंबर 2022 पर्यंत देशभरात 62 हजार 347 महिला व मुलांवरील सायबर गुन्ह्यांची नोंद आहे. कर्नाटकात एका वर्षात 2 हजार 482 गुन्हे दाखल झाले आहेत. 95 टक्के गुन्ह्यात गुन्हेगारांचा थांगपत्ता व तपास नाही. अनोळखी गुन्हेगारांनीच हे कृत्य केल्याची नोंद आढळते. फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या महिला व ऑनलाईन गेम खेळणारी मुले सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य बनत आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी लहान मुलांच्या हातात अँड्रॉईड फोन आले. त्यामुळेही त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येते.
फ्रेंडरिक्वेस्ट स्वीकारणाऱ्यांची लुबाडणूक
सोशल मीडियावर अधिकाधिक वैयक्तिक माहिती शेअर करणाऱ्या महिला व तरुणींना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. वधू-वर सूचक मंडळ अॅपच्या माध्यमातूनही फसवणुकीचे प्रकार वाढले असून बऱ्याच प्रकरणात बेअब्रू होण्याच्या भीतीने एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते. फेसबुकवर अनोळखींकडून येणाऱ्या फ्रेंडरिक्वेस्ट स्वीकारणाऱ्यांची लुबाडणूक ही ठरलेलीच. ‘आपण कोट्याधीश आहोत. तुमच्यासाठी काही तरी मोठी भेटवस्तू देणार आहोत’ असे सांगत सायबर गुन्हेगारांनी अनेक महिलांना कोट्यावधी रुपयांना ठकविले आहे. ‘भेटवस्तू कोटीच्या घरात आहे. भारतात त्याचा टॅक्स भरावा लागणार आहे. माझ्याकडे डॉलर आहे, टॅक्स रुपयामध्ये भरावा लागणार आहे. मला ऑनलाईन पैसे पाठवा. तुमची कोटीची भेटवस्तू क्लियर करून घरी पाठवितो’, असे सांगत सायबर गुन्हेगार लाखो रुपये भरून घेतात. अशा बहुतेक प्रकरणात महिलाच फशी पडल्या आहेत.
फेक अकाऊंटच्या माध्यमातून फसवणूक
फ्रेंडरिक्वेस्ट पाठविणारी व्यक्ती कोण आहे? ती खरी आहे की भलत्याच्याच फोटोचा वापर करून खोटे अकाऊंट सुरू झाले आहे, याची खात्री करून घेतल्याशिवाय फ्रेंडशिप करणाऱ्या अनेकांची फसवणूक झाली आहे. अनेक प्रकरणात तर सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणारे फोटो, फोन क्रमांक आदींचा वापर करीत फेक अकाऊंट उघडले जाते. त्या अकाऊंटच्या माध्यमातून सावजांची फसवणूक केली जाते. त्यामुळेच वैयक्तिक फोटो किंवा माहिती अपलोड करताना खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर क्राईम विभागातील अधिकारी करतात.
खबरदारी न घेतल्यास फसवणूक ठरलेलीच!
अश्लील फोटो बनविण्यासाठी सायबर गुन्हेगार मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करतात. एखाद्या व्यक्तीचा फोटो मिळाला की तंत्रज्ञानाच्या मदतीने नग्न फोटो किंवा व्हिडिओ तयार केले जातात. एटीएम ब्लॉक झाले आहे, लॉटरी लागली आहे, असे सांगत बँक ग्राहकांना लुटण्याचे प्रकार तर सुरूच आहेत आता सोशल मीडियावर मैत्री करीत महिला, मुले व तरुणींना ठकवण्याचे प्रकार वाढले असून खबरदारी घेतली नाही तर फसवणूक ही ठरलेलीच असते.









