कार्यकर्त्यांसह बस घातली थेट खड्डय़ात
तामिळनाडूतील कांचीपुरम येथील एका आमदाराला बस चालविण्याची हौस चांगलीच महागात पडली आहे. लोकप्रतिनिधींना विविध कामांचे उद्घाटन करणे आवडते हे सर्वांनाच माहित असावे. पण सध्या एका आमदाराने रस्त्याचे उद्घाटन केल्यावर थेट बस चालविण्याचे केलेले धाडस भलतच अंगलट आले. या आमदाराने बस चालविताना केलेल्या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
कांचीपुरम येथील द्रमुक आमदार सीव्हीएमपी एझिलारासन यांनी स्वतःच्या मतदारसंघातील एका नव्या बसमार्गाचे उद्घाटन केले. यावेळी आमदाराने शासकीय बससेवेला हिरवा झेंडा दाखविला आणि त्यानंतर चक्क बस चालवायला घेतली. आमदारच बस चालविणार म्हटल्यावर कार्यकर्ते मागे राहणे शक्यच नव्हते. आमदार बस चालविण्यापूर्वी द्रमुकचे कार्यकर्ते बसमध्ये चढले. आमदार चालवत असलेल्या बसमध्ये माजी मुख्यमंत्री करुणानिधी, विद्यमान मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र तसेच राज्याचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांची छायाचित्रे लावण्यात आली होती.

काही अंतरापर्यंत बस चालविल्यावर आमदाराने बसवरील नियंत्रण गमाविले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असणाऱया खड्डय़ात गेली. या बसने प्रथम रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले द्रमुकचे झेंडे चिरडले. खोल खड्डय़ात गेल्यावर ही बस एका बाजूला कलंडली. खड्डय़ानजीक एक विजेचा खांब असल्याने बसमधून द्रमुक कार्यकर्ते तसेच इतरांना त्वरित बाहेर काढावे लागले.
बस खड्डय़ात गेल्यावर सर्वप्रथम आमदाराला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अनेकांनी बसला ढकलून खड्डय़ातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दीर्घ प्रयत्नानंतर अखेर बस खड्डय़ातून बाहेर काढता आली. या अपघातामुळे बसचे नुकसान झाले आहे. आमदारांची बस चालविण्याची हौस सरकारला आणि स्वतः आमदारालाही महागात पडल्याचे सोशल मीडिया युजर्स म्हणत आहेत.









