ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या समाजशास्त्र विषयाच्या 210 शिक्षकांचे डिमोशन होणार आहे. या शिक्षकांना उपशिक्षक म्हणून पहिली ते पाचवीच्या वर्गांची जबाबदारी देण्यात येणार आहे.
सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या 2795 शाळांमध्ये सध्या 9000 शिक्षक आहेत. पटसंख्येच्या तुलनेत समाजशास्त्र विषयांचे शिक्षक भरपूर आहेत. येथील शाळांसाठी समाजशास्त्र विषयाची 161 पदे मंजूर आहेत, पण सध्या शाळांमध्ये समाजशास्त्राचे तब्बल 400 शिक्षक आहेत. म्हणजेच 239 शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यांना अतिरिक्त होण्याची भीती असल्याने त्यामधील 210 शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांकडे लिखित स्वरुपात उपशिक्षक करण्याची विनंती केली आहे.
शिक्षकांच्या विनंतीवरुन या 210 शिक्षकांना उपशिक्षक करण्यात येणार आहे. विषय शिक्षकांवर सहावी ते आठवीच्या वर्गाची जबाबदारी असते. तर उपशिक्षकांवर पहिली ते पाचवीच्या वर्गांची जबाबदारी असते. या 210 शिक्षकांवर आता ती जबाबदारी राहील.








