पिंपरी / प्रतिनिधी :
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या 338 व्या पायीवारी पालखी सोहळय़ाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्या पालखी सोहळय़ाला श्री क्षेत्र देहू येथून दहा जूनला प्रस्थानाने प्रारंभ होणार आहे. पालखी सोहळा 28 जूनला पंढरपूरला पोहोचणार आहे. याबाबतची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम मोरे यांनी दिली.
पालखी सोहळा प्रमुखपदी संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे यांची निवड केली आहे. दहा जून रोजी देहूतील मुख्य मंदीरात पालखी प्रस्थान कार्यक्रम होणार आहे. पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहूगाव येथील इनामदार साहेब वाडय़ात होईल. 11 जून आकुर्डी विठ्ठलमंदिर, 12 व 13 जून श्री निवंडुंगा विठ्ठल मंदिर नाना पेठ पुणे, 14 जून लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिर, 15 जून यवत (पालखी तळ, श्री भैरवनाथ मंदिर),16 जून वरवंड (श्री विठ्ठल मंदिर), 17 जून उंडवडी गवळय़ाची, 18 जून बारामती शारदा विद्यालय, 19 जून सणसर (पालखी तळ) ,20 जून दुपारचे बेलवडी गोल रिंगण नंतर आंथर्णे (पालखी तळ), 21 जून निमगाव केतकी (पालखी तळ), 22 जून इंदापूर येथे (गोल रिंगण) इंदापूर ( पालखी तळ) 23 जून सराटी, 24 अकलुज (माने विद्यालय येथे गोल रिंगण नंतर (पालखी तळ), 25 जून माळीनगर येथे उभे रिंगण बोरगाव ( पालखी तळ),26 जून तोंडले बोंडले येथे धावा, पिराची कुरोली गायरान (पालखी तळ), 27 जून बाजीराव विहिर येथे उभे रिंगण,वाखरी (पालखी तळ) येथे मुक्काम झाल्यानंतर 28 जून रोजी पादुका आरती येथे उभे रिंगण झाल्यावर पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या श्री संत तुकाराम महाराज मंदिरात (नविन इमारतीत) पालखी मुक्कामी विसावणार आहे. तर, 29 जूनला नगर प्रदक्षिणा करून पालखी 3 जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपुर येथे मुक्कामी राहणार आहे. 3 जुलैला दुपारी पंढरपूर वरून परतीच्या प्रवासाला सुरूवात होईल. 13 जुलै रोजी पालखी सोहळय़ाची सांगता देहूतील मुख्य मंदीरात होईल.
नवीन दिंडय़ांचा अर्ज स्वीकारणार
यंदा प्रथमच नवीन दिंडय़ांचा अर्ज स्वीकारला जाणार आहे. पालखी सोहळय़ात असणाऱ्या 329 दिंडय़ामध्ये नवीन दिंडय़ांची वाढ होणार असल्याने दिंडय़ांची संख्याही वाढणार आहे. पालखी सोहळय़ाच्या तयारीला प्रारंभ करण्यात आला आहे. नैमितीक कामे संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आली असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले.








