राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती, आचारसंहिता लागू, 7 रोजी निकाल
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील सांखळी आणि फोंडा या दोन्ही पालिकांची निवडणूक येत्या दि. 5 मे रोजी घेण्यात येणार असून निवडणूक जाहीर झाल्यामुळे दोन्ही ठिकाणी शनिवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त डब्लू. रमणमूर्ती यांनी शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाचे साहाय्यक संचालक सागर गुरव यांचीही त्यावेळी उपस्थिती होती. ही निवडणूक राजकीय पक्ष विरहित होणार असल्याचे रमणमूर्ती यांनी स्पष्ट केले.
फोंडा आणि सांखळी या नगरपालिकांचा कार्यकाळ 20 मे 23 रोजी संपुष्टात येत असून त्या अनुषंगाने दि. 5 मे रोजी दोन्ही ठिकाणी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीची मतदानप्रक्रिया मतपत्रिकेच्या माध्यमातून होणार असून दि. 7 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, असे रमणमूर्ती यांनी सांगितले. सकाळी 8 ते 5 या दरम्यान मतदान प्रक्रिया होईल. तर 4 ते 5 या दरम्यान कोविडबाधित ऊग्णांसाठी खास वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे.
फोंडा नगरपालिकेत 15 प्रभाग तर सांखळी पालिकेचे 12 प्रभाग आहेत. त्यातील एक तृतीयांश म्हणजे फोंड्यात 5 आणि सांखळीत 4 प्रभाग ओबीसी आणि महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्दिष्ट केलेल्या तिहेरी चाचणीचा विचार करूनच दोन्ही ठिकाणी प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत, असे रमणमूर्ती यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून फोंडा आणि डिचोली तालुक्यांचे जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर दोन्ही तालुक्यांचे मामलेदार साहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय आयोगाने सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक आणि भरारी पथकांचीही नियुक्ती केली आहे. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारास ऊ. 2 लाखपर्यंत खर्चाची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
दि. 10 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार असून दि. 18 रोजी शेवटचा दिवस असेल. रोज सकाळी 8 ते दुपारी 1 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत. दि. 14 आणि 16 हे दोन दिवस सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता अर्जांची छाननी होईल. त्यानंतर दि. 20 रोजी दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत असेल व नंतर त्याचदिवशी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. रविवार दि. 7 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होईल व त्या दरम्यान निकाल जाहीर करण्यात येतील, अशी माहिती रमणमूर्ती यांनी दिली









