बाजारपेठ भागातील एटीएममध्ये ठणठणाट
प्रतिनिधी/ बेळगाव
बँका तसेच वित्तीय संस्थांना सलग सुट्या असल्याने याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर होत आहे. बँका बंद असल्याने पैसे काढण्यासाठी एटीएमवरचा भार वाढला आहे. यामुळे बाजारपेठ भागात असणाऱ्या एटीएममध्ये ठणठणाट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
एप्रिल महिन्यात बँक तसेच सरकारी विभागाला सर्वाधिक सुट्या आहेत. सध्या सुरू असणाऱ्या आठवड्यात मंगळवारी भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव, त्यानंतर गुडफ्रायडे, सेकंड सॅटर्डे तर रविवारी साप्ताहिक सुटी अशा सलग सुट्या देण्यात आल्या. सलग सुट्यांमुळे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. मोठ्या रकमेसाठी आता सोमवारीच बँका उघडेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
एटीएममध्ये ठणठणाट
बँका बंद असल्याने एटीएम तसेच ऑनलाईन पेमेंटवर भार पडला. बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करणे शक्य नसल्याने खिशामध्ये रक्कम असणे गरजेचे असते. त्यामुळे एटीएममध्ये जाऊन पैसे काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सध्या अनेक गावच्या यात्रा तसेच लग्नसराईचे दिवस असल्यामुळे रोख रकमेची गरज भासते. त्यामुळे एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु बाजारपेठ परिसरातील बऱ्याच एटीएममध्ये नो कॅशचे बोर्ड झळकत आहेत.









