मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, रहाणेचे अर्धशतक, जडेजा ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या 12 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सचा 11 चेंडू बाकी ठेवून सात गड्यांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेत चेन्नईचा हा दुसरा विजय असून मुंबईचा संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. चेन्नई संघातील अजिंक्य रहाणेने दमदार अर्धशतक झळकविले तर ऋतुराज गायकवाड, दुबे आणि रायडू यांनीही आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावला. 20 धावात 3 गडी बाद करणाऱ्या रविंद्र जडेजाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने 20 षटकात 8 बाद 157 धावा जमविल्या. चेन्नईतर्फे रविंद्र जडेजा, तुषार देशपांडे आणि सँटेनर हे प्रभावी गोलंदाज ठरले. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने 18.1 षटकात 3 बाद 159 धावा जमवित आपले विजय नोंदवला.

या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या 4 षटकात 38 धावांची भागीदारी केली. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर कर्णधार शर्माचा त्रिफळा उडाला. त्याने 13 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 21 धावा जमविल्या. इशान किशनने 21 चेंडूत 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तो प्रेटोरियसकरवी झेलबाद झाला. फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असलेला सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ठरला. सँटेनरने त्याला धोनीकरवी झेलबाद केले. कॅमेरून ग्रीनने 11 चेंडूत 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. जडेजाने स्वत:च्याच गोलंदाजीवर ग्रीनला टिपले. सँटेनरने मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का देताना अर्शद खानला 2 धावांवर पायचीत केले. मुंबई इंडियन्सची यावेळी स्थिती 9.1 षटकात 5 बाद 76 अशी होती. तिलक वर्मा आणि टिम डेव्हिड यांनी सहाव्या गड्यासाठी 26 धावांची भर घातली. जडेजाच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तिलक वर्मा पायचीत झाला. त्याने 18 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या मगालाने स्टब्जला 5 धावांवर गायकवाडकरवी झेलबाद केले. तुषार देशपांडेने टिम डेव्हिडला रहाणेकरवी झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 31 धावा जमविल्या. शोकिनने 13 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 18 तर पियुष चावलाने नाबाद 5 धावा जमविल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी 5 वाईड चेंडूसह एकूण 8 धावा अवांतराच्या रूपात दिल्या. मुंबई इंडियन्सच्या डावात 4 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. चेन्नई सुपरकिंग्जतर्फे रविंद्र जडेजाने 20 धावात 3, सँटेनरने 28 धावात 2, तुषार देशपांडेने 31 धावात 2 तर मगालाने 37 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नई सुपरकिंग्जच्या डावालाही चांगली सुरुवात झाली नाही. बेरेनडॉर्फच्या पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर चेन्नईचा सलामीचा फलंदाज कॉन्वे खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचित झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणे यांनी आक्रमक फलंदाजी करत दुसऱ्या गड्यासाठी 7.2 षटकात 82 धावांची भागीदारी केली. बऱ्याच दिवसापासून फलंदाजीचा सूर मिळवण्यासाठी झगडत असलेल्या अजिंक्य रहाणेने या सामन्यात आक्रमक फटकेबाजी करताना 27 चेंडूत 3 षटकार, 7 चौकारासह 61 धावा झोडपल्या. तो डावातील 8 व्या षटकात झेलबाद झाला. चावलाने त्याला यादवकडे झेल देण्यास भाग पाडले. रहाणे बाद झाल्यानंतर गायकवाड आणि दुबे यांनी तिसऱ्या गड्यासाठी 6.2 षटकात 43 धावांची भर घातली. चेन्नई संघाचे शतक 64 चेंडूत फलकावर लागले. कार्तिकेयने दुबेला त्रिफळाचित केले. त्याने 26 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 28 धावा जमवल्या. गायकवाड आणि अम्बाती रायडू यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 34 धावांची भागीदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रायडूने 16 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 20 तर ऋतुराज गायकवाडने 36 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 40 धावा झळकवल्या. चेन्नईच्या डावात 10 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 6 वाईड आणि 4 लेगबाईजचा समावेश आहे. चेन्नईच्या डावामध्ये 5 षटकार आणि 14 चौकार नोंदवले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे बेरेनडॉर्फ, पियुष चावला आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स 20 षटकात 8 बाद 157 (रोहित शर्मा 21, ईशान किशन 32, ग्रीन 12, सूर्यकुमार यादव 1, तिलक वर्मा 22, अर्शद खान 2, टिम डेव्हिड 31, स्टब्ज 5, शोकिन नाबाद 18, चावला नाबाद 5, अवांतर 8, रविंद्र जडेजा 3-20, सँटेनर 2-28, तुषार देशपांडे 2-31, मगाला 1-37).
चेन्नई सुपरकिंगज : 18.1 षटकात 3 बाद 159 (कॉन्वे 0, ऋतुराज गायकवाड नाबाद 40, अजिंक्य रहाणे 61, शिवम दुबे 28, अम्बाती रायडू नाबाद 20, अवांतर 10, बेरेनडॉर्फ 1-24, पीयुष चावला 1-33, कुमार कार्तिकेय 1-24).








