ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दहा हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानीला अहमदाबादमधून ईडीने ताब्यात घेतले आहे. जयसिंघानी हा 15 हून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी असून, सट्टेबाजीच्या प्रकरणात त्याला तीन वेळा अटक झाली आहे.
अनिल जयसिंघानी हा क्रिकेट बुकी आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, तो मागील सात वर्षांपासून फरार होता. त्याची मुलगी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी मागील 16 महिन्यांपासून अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. तिने वडिल अनिल जयसिंघानी यांना एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच ऑफर केली होती. तसेच त्यासाठी धमकीही दिली होती. अमृता फडणवीस यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या ताबा मध्यप्रदेश पोलिसांनी घेतला होता. जयसिंघानी सध्या तरूंगात होता.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने त्याच्या भोवतीचा फास आवळला असून, त्याला मध्यप्रदेश पोलिसांकडून आपल्या ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती.









