वन खात्याकडून बोंडला प्राणी संग्रहालयात रवानगी

वाळपई : खोतोडा पंचायत क्षेत्रातील शिरसोडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्या वाघाला वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून जीवदान दिले. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या शिरसोडा व आसपास गावात दहशत माजवीत होता. त्यांनी आतापर्यंत अनेक कुत्र्यांवर हल्ला करून आपले भक्ष्य केले होते. यामुळे या भागातील नागरिक सदर बिबट्याच्या दहशतीमुळे हैराण झाले होते. खोतोडा पंचायत क्षेत्रातील शिरसोडा येथे. सदर बिबट्या रात्रीच्यावेळी विहिरीमध्ये पडला होता. स्थानिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत वाळपईच्या वनाखात्याला खबर दिली. त्यानंतर वाळपई वनपरिक्षेत्र अधिकारी श्यामसुंदर गावस म्हादई अभयारण्याचे परिक्षेत्र अधिकारी गिरीश बैलुडकर यांच्या नेतृत्वाखाली सदर बिबट्याला पिजऱ्यात बंदीस्त करून विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला करून बोंडला येथे नेऊन सोडण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी श्यामसुंदर गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे. बिबट्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नसून तो बिबट्या तंदुऊस्त आहे. काही प्रमाणात भयभीत अवस्थेत होता, असे त्यांनी सांगितले. त्याची रवानगी बोंडला प्राणी संग्रहालयात करण्यात आली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान, शिरसोडा भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या काजूचा मोसम सुरू आहे. यामुळे हा बिबटा सातत्याने काजूच्या बागायतीमध्ये नागरिकांच्या नजरेस पडत होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.









