आरोग्यमंत्र्यांचे गोमेकॉला निर्देश : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या आभासी परिषदेत घेतला सहभाग
पणजी : राज्यात कोरोना ऊग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जीनोम सिक्वेन्सिंग यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश गोमेकॉच्या टीमला दिले आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य खात्याने अँटीजेन चाचणीचा वापर करून सरकारी ऊग्णालयांमध्ये ऊग्णांची चाचणी देखील सुरू केली आहे. त्याशिवाय गरज भासल्यास जीनोम क्रमवारी प्रोटोकॉल आणि एसओपीएसनुसार आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते, अशी माहिती राणे यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची आभासी परिषद घेण्यात आली. त्यात कोविड-19ची सद्यस्थिती आणि त्यासाठी प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत सहभागी झाल्यानंतर श्री. राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले. तसेच कोविड-19 व्यवस्थापनासाठी सर्व तयारी ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना दि. 8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकार्यांसह आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यास सांगितले. तसेच दि. 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व ऊग्णालयांच्या पायाभूत सुविधांचे मॉक ड्रिल करण्याचे आवाहन केले, अशी माहिती राणे यांनी दिली. आयएलआय/एसएआरआय प्रकरणांच्या ट्रेंडचे निरीक्षण करावे, तसेच कोविड-19 आणि इन्फ्लूएन्झाच्या चाचणीसाठी पुरेसे नमुने पाठवून नवीन हॉटस्पॉट ओळखण्याचे आवाहन श्री. मांडविया यांनी राज्यांना केले, असे राणे यांनी सांगितले.









