तिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
माजी संरक्षणमंत्री ए. के. ऍन्टोनी यांचे पुत्र अनिल ऍन्टोनी यांच्या भाजपप्रवेशानंतर केरळमधील अनेक नेते भाजपमध्ये येणार आहेत, असे प्रतिपादन केरळ राज्य भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केले आहे. अनिल ऍन्टोनी यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राहुल गांधींच्या कार्यपद्धतीला कंटाळून पक्षत्याग केल्याचे ऍन्टोनी यांनी स्पष्ट केले होते. केरळच्या काँगेसमध्ये असे अनेक नाराज नेते असून ते आता भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. पक्षही त्यांना प्रवेश देऊ शकतो, असे सुतोवाच सुरेंद्रन यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
गेल्या वर्षभरात केरळमध्ये अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अतिशय उच्चशिक्षित आणि धर्मनिरपेक्ष मानल्या जाणाऱया नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रभावित होऊन भाजपला जवळ केले आहे. भाजपची केरळ राज्यशाखाही अनेक नेत्यांच्या संपर्कात असून त्यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन करीत आहे. राज्यात भाजपचा पाया दणकट असून विविध पक्षांमधून येणाऱया नेत्यांमुळे आता जनाधारही विस्तृत होऊ लागला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या या वाढीचे प्रतिबिंब पहावयास मिळेल. भाजप ख्रिश्चन मतदारांमध्येही लोकप्रिय होत आहे, असे सुरेंद्रन यांनी स्पष्ट केले.









