वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली अबकारी घोटाळय़ाप्रकरणी तुरुंगात कैद असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देशाला संबोधित करणारे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. लोक कंपनीत मॅनेजरपदासाठी उच्चशिक्षित व्यक्ती शोधतात, मग देशाचा सर्वात मोठा मॅनेजर उच्चशिक्षित असायला हवा असे सिसोदियांनी पत्राद्वारे म्हटले आहे.
कमी शिकलेला पंतप्रधान असणे देशासाठी धोकादायक आहे. पंतप्रधान मोदींना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही. मागील काही वर्षांमध्ये त्यांनी देशभरात 60 हजार शाळा बंद केल्या आहेत. देशाच्या प्रगतीसाठी पंतप्रधान शिकलेला असणे आवश्यक आहे. नाल्यातून गॅस मिळत चहा तयार करता येतो असे जेव्हा पंतप्रधान म्हणतात, तेव्हा धक्काच बसत असल्याची उपहासात्मक टिप्पणी सिसोदियांनी पत्रात केली आहे.
पंतप्रधान अल्प शिक्षित असल्याने जगातील अन्य राष्ट्राध्यक्ष त्यांची गळाभेट घेत अनेक कागदपत्रंवर स्वाक्षरी करवून घेत आहेत. देशाची तरुणाई महत्त्वाकांक्षी आहे. या तरुणाईला संधीची आस असून विज्ञान अन् तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात यश मिळविण्याची इच्छा आहे. एक अल्प शिक्षित पंतप्रधान सध्याच्या तरुणाईच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची क्षमता बाळगून आहे का? अलिकडच्या वर्षांमध्ये देशभरात 80 हजार शासकीय शाळा बंद करण्यात आल्या. एकीकडे देशाची लोकसंख्या वाढत असल्याने शासकीय शाळांची संख्याही वाढणे अपेक्षित होते असा दावा सिसोदियांनी पत्राद्वारे केला आहे.
मनीष सिसोदिया हे अबकारी घोटाळय़ाप्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले आहेत. सिसोदिया हे जामिनासाठी सातत्याने अर्ज करत आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 12 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. तर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 17 एप्रिलपर्यंत वाढविली आहे.









