आंध्रचे माजी मुख्यमंत्री रेड्डींचा काँग्रेस पक्षशेष्ठींवर हल्लाबोल ः भाजपमध्ये केला प्रवेश
वृत्तसंस्था / अमरावती
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रेड्डी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एका ओळीचे राजीनामापत्र पाठविले होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना केवळ पक्षाचे नियंत्रण हवे आहे, कुठलीच जबाबदारी घेणे नको असल्याचा आरोप रेड्डी यांनी भाजपप्रवेशानंतर बोलताना केला आहे. रेड्डी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
रेड्डी यांनी 2014 मध्ये संपुआ सरकारने आंध्रप्रदेशचे विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यावर काँगेस पक्ष सोडला होता. तेव्हा त्यांनी स्वतःचा जय समैक्य आंध्र पक्ष स्थापन केला होता, तसेच लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार केले होते, परंतु यश न मिळाल्याने 2018 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
काँग्रेस पक्षात सातत्याने चुकीचे निर्णय घेतले गेले, एका मागोमाग एक चुकीच्या निर्णयांमुळे सर्व राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत ठरला आहे. ‘आमचा राजा अत्यंत हुशार आहे, तो स्वतः विचार करू शकत नाही आणि कुणाचा सल्ला ऐकत नाही’ या अर्थाची एक म्हण असून ती काँग्रेस नेतृत्वाला लागू होत असल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षशेष्ठी लोकांशी संवाद साधत नाहीत, नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे. पक्षश्रेष्ठींना केवळ नियंत्रण करण्याची शक्ती हवी आहे, परंतु जबाबदारी स्वीकारणे अन् मेहनत करणे नको आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना राज्यात कुठल्या व्यक्तीला कोणती जबाबदारी द्यावी हेच माहित नसते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना स्वतःच्या पक्षातील नेत्यांचे चरित्र माहित नाही. लोकांमध्ये मिळून मिसळून राहणाराच खरा नेता असतो असे म्हणत रेड्डी यांनी काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य केले आहे.
पंतप्रधान मोदींचे कौतुक
सर्व राज्यांमध्ये काँग्रेसचे नुकसान होत असताना पक्षश्रेष्ठी संबंधितांशी चर्चा करू इच्छित नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपमध्ये नेते पक्षासाठी कठोर मेहनत करत आहेत. तसेच राष्ट्राबद्दल त्यांची प्रतिबद्धता प्रशंसनीय आहे. भ्रष्टाचार विरोधात पंतप्रधान मोदींनी लढा चालविला असल्याचे उद्गार रेड्डी यांनी काढले आहेत.
ए.के. अँटोनींच्या पुत्राचा प्रवेश
एक दिवसापूर्वीच म्हणजेच गुरुवारी काँग्रेस नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मला एका खास परिवारासाठी नव्हे तर सर्वसामान्यांसाठी काम करायचे आहे. पुढील 25 वर्षांमध्ये भारताला विकसित राष्ट्र करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी काम करायचे असल्याचे अद्गार अनिल अँटोनी यांनी काढले होते. अनिल यांनी जानेवारीमध्ये काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अनिल हे केरळ काँग्रेसचे सोशल मीडिया समन्वयक होते. बीबीसीच्या माहितीपटाप्रकरणी अनिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ ट्विट केला होता. हा ट्विट डिलिट करण्यासाठी काँग्रेसने त्यांच्यावर दबाव आणला होता.









