घर, बंदूक आणि बिरयानी या नागराज मंजुळे यांच्या रावडी चित्रपटाची मोठी चर्चा आहे. ही मराठी दिग्दर्शकाची दाक्षिणात्य वर्चस्वाला खुन्नस आहे की हातमिळवणी? यावर मराठी चित्रक्षेत्राचा नजिकचा भविष्यकाळ घडणार आहे. ‘हान की बडीव इतिहास घडीव’ असे राज्याच्या राजकारणातही घडत असताना दिग्दर्शकाची शैलीबदल हे समकालाचेही दर्शन ठरत आहे.
नागराज मंजुळे एखादी कलाकृती घेऊन येतात तेव्हा त्यामागे खूप मोठा विचार दडलेला असतो, हे आता मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांनाही माहीत झालेले आहे. त्यांच्या पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट आणि झुंडने प्रत्येक वेळी नव्याने विचारांना चालना
दिली.

एखादा दिग्दर्शक आपली एक भूमिका घेऊन जेव्हा सिनेमा बनवतो तेव्हा ते त्याच्या भवतालाचे त्याला झालेले आकलन आणि त्याने समाजाला घडवलेले दर्शन असते. त्यामुळेच नागराजअण्णा काय घेऊन येणार याकडे मराठी आणि हिंदी फिल्म सृष्टीचेही लक्ष लागले होते. त्याचवेळी नागराज अण्णांनी दाक्षिणात्य बिर्याणी पकवली! तर नेमके त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी दोन दिवस राजकारण्यांच्या फडतूस, काडतूस अशा वक्तव्याने महाराष्ट्राला पकवले! असो. मराठीत श्वास पासून सुरू झालेली आशयगर्भ चित्रपटांची लाट नागराज मंजुळे यांच्यापर्यंत येत कमालीची लोकप्रिय आणि व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वीही
झाली.
याच काळात दक्षिणेत अनेक चित्रपट गल्ला भरण्याच्या स्पर्धेत सर्वात अव्वल ठरले आणि त्यांनी जगातील प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून आणले. बाहुबली, पुष्पा, केजीएफ ही त्यापैकीच काही नावे. तर कांतारा हा कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटही यश मिळवून गेला. या पार्श्वभूमीवर घर, बंदूक, बिरयानी या मराठी चित्रपटातील मंजुळेंचा अभिनय, दक्षिणात्य हिरो प्रमाणे असणारा लुक, त्यांचा निर्माता, क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून असणारा प्रभाव आणि पोलीस राया पाटील विरूद्ध जंगलातील डाकू कमांडरशी होणारी झडप असे कथानक, सोबतीला मराठमोळी हालगी हे पारंपारिक वाद्य आणि रॅपगिताशी स्पर्धा करणारे ‘हान की बडीव, इतिहास घडीव’ गाणे हे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हा लेख प्रसिद्ध होईल त्या दिवशी प्रेक्षकांनी चित्रपट पाहिलेला असेल आणि संपूर्ण कथानक प्रेक्षकांसमोर येईलच. त्यांना त्यातून काय मिळाले आणि मराठीत पुन्हा इतिहास घडणार का? याचे उत्तर कदाचित त्यावेळी मिळालेलेही असेल.
पण दाक्षिणात्य चित्रपटांना तगडी फाईट देणारा हा चित्रपट असेल आणि अलीकडच्या काळात गाजलेल्या दक्षिणेतील चित्रपटांप्रमाणे किंवा त्याहून सरस कलाकृती मराठीत निर्माण होऊ शकते हे उत्तर नागराज यांनी दक्षिणेला दिलेले असेल. किंवा कदाचित तो दक्षिणेशी युतीसाठी पुढे केलेला हातही असल्याचे स्पष्ट होईल. मराठी किंवा मुंबईतील फिल्म इंडस्ट्री या पद्धतीने जगात आपले नाणे खणखणीतपणे पुन्हा वाजवून दाखवेल का? हे मराठी रसिक ठरवतील आणि त्यांच्या प्रतिसादावर भारतभरातील रसिकांचा प्रतिसाद अवलंबून असेल. एका अर्थाने मराठीच्या कक्षा खरोखर रुंदावणाऱया नागराज मंजुळे यांच्यासारख्या दिग्दर्शकाची ही एक निकोप स्पर्धा असेल.
शेखर रणखांबे यांचे यश
नागराज यांच्यासारख्या विचारी दिग्दर्शकांकडून प्रेरणा घेत सांगली जिह्यातल्या पेड सारख्या गावातून आलेल्या शेखर रणखांबे या युवा दिग्दर्शकाने नुकतेच एक मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिक जिंकलेल्या ‘रेखा’ या शॉर्ट फिल्मने साता समुद्रापार डंका पिटत बर्लिन आर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्तम इंडी फिल्म आणि सर्वोत्तम दिग्दर्शक हे पुरस्कार पटकावल्याचे पुढे आले आहे.
या ‘इंडी’चा अर्थ स्वतःच्या जीवावर, कोणत्याही स्टुडिओ अथवा मोठय़ा नावाचा वापर न करता स्वतंत्रपणे घडवलेली शॉर्ट फिल्म असा होतो. शेखर रणखांबे, उमेश मालन यांच्यासारखे अनेक धडपडे मराठी युवा दिग्दर्शक या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवत आहेत. मराठी कलाक्षेत्राचा असा बोलबाला होत असताना आपल्या वेगळय़ा चित्र शैलीला मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक नेमके कशा पद्धतीने पुढे नेतात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. वास्तववादी चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट अशा समांतर प्रवासात मराठी दिग्दर्शकांनी आपले आगळे वेगळेपण राखले आहे.
एका बाजूला व्यावसायिक यश मिळवत असताना दमदार कथानक, दिग्दर्शकांची झोकून देण्याची वृत्ती आणि कस लावून अभिनयाचा वाढवत ठेवणारे अभिनेते, अभिनेत्री, सोबतीला तंत्र आणि संगीताची जोड अशा वैशिष्टांसह मराठी चित्रपट आपले वेगळेपण दाखवत आहे. मंजुळे यांच्यामुळे लाभलेल्या व्यावसायिक यशाने मराठीतील यशस्वी चित्रपटांच्या बाबतीतील धारणेत बदल झाला आहे.
मात्र तरीही बहुतांश दिग्दर्शकांना अपेक्षित अर्थ पुरवठादार मिळत नाहीत. हा मराठीतील चांगल्या दिग्दर्शकांच्या वाटेतील मोठा अडथळा आहे. नागराज मंजुळे यांच्या प्रदीर्घ धडपडीने त्यांचा मार्ग सुकर झाला. मात्र इतरांचे तसे नाही. त्यांची धावपळ सुरूच आहे. दक्षिणेतील चित्रपटांचा एक बाज आहे. तो हमखास यशस्वी होतोय आणि मराठीत आज हमखास यशाचा असा फॉर्म्यूला ठरलेला नाही. नागराज मंजुळे यशस्वी होतात त्याच मार्गाने मराठी चालली आहे.
शिवराज काटकर








