वृद्धापकाळात नोंदविला विक्रम
सद्यकाळात पुरुषांमध्ये दाढी वाढविण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. परंतु कधी तुम्ही महिलेला दाढी वाढविताना पाहिले आहे का? हे कसे शक्य आहे असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. पण सध्या अमेरिकेतील एक महिला स्वतःच्या दाढीमुळे लोकप्रिय ठरली आहे. तसेच या महिलेने एक विश्वविक्रम नोंदविला आहे. फरक इतकाच आहे की या महिलेने छंद म्हणून नव्हे तर नाईलाज म्हणून ही दाढी वाढविली आहे.
ओक्लाहोमाच्या लॉटन येथे राहणाऱया 74 वर्षीय विवियन व्हीलर यांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. सर्वात लांब दाढी राखणारी महिला म्हणून त्यांना ओळखले जाते. 3 मुलांची आई अन् आता आजी झालेल्या या महिलेची दाढी 10 इंच लांबीची आहे.

विवियन यांनी स्वतःहून ही दाढी वाढविलेली नाही. त्यांना एक मेडिकल कंडिशन असून त्याचे नाव हर्माफ्रोडाइटिज्म आहे. या कंडिशनने ग्रस्त लोक 50 टक्के पुरुष आणि 50 टक्के महिला असतात. याचबरोबर त्यांना जन्मापासून हायपरट्रायकोसिस नावाची एक कंडिशन असून त्याला ‘वेयरवुल्फ सिंड्रोम’ म्हणूनही ओळखले जाते.
विवियन यांचे वय 5 वर्षे असताना त्यांचे केस वेगाने वाढू लागले होते. अशा स्थितीत त्यांच्या वडिलांनी तिला सर्कसमध्ये भरती केले होते, जेथे विवियन यांना दर महिन्याला 81 हजार रुपयांची कमाई प्राप्त व्हायची. वयाच्या 55 वर्षांपयंत त्यांना बियर्डेड लेडी या नावाने ओळखले गेले. केवळ स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मी सर्कसमध्ये काम करत होते. सर्कसमधून घरी परतल्यावर वडिल बळजबरीने शेव्ह करायला लावत होते. परंतु स्वतःच्या या जीवनाला वैतागून 1990 पासून दाढी करणे बंद केले आणि स्वतःच्या दाढीला शरीराचा एक हिस्सा मानत जगण्यास सुरुवात केल्याचे त्या सांगतात.









