अंडी दिल्यावर करते स्वतःचाच छळ
प्राण्यांमध्ये अशा अनेक प्रजाती आहेत, ज्या प्रजननानंतर मृत्युमुखी पडतात. समुद्रात आढळून येणारा ऑक्टोपस याचपैकी एक आहे. मादी ऑक्टोपस अंडी दिल्यावर मृत्यूच्या दिशेने वाटचाल करू शकते, पिल्लं अंडय़ातून बाहेर येईपर्यंत मादी ऑक्टोपसचा मृत्यू झालेला असतो. ऑक्टोपस हा जीव अत्यंत कमी वयातच अनाथ होत असतो.
मादी ऑक्टोपस अत्यंत वेदनादायी पद्धतीने आत्महत्या करते. मादी ऑक्टोपस अंडी दिल्यावर अन्न त्यागते आणि स्वतःला ईजा करू लागते. स्वतःची त्वचा खेचून वेगळी करते, तसेच टेन्टेकल्सची टिप किंवा वरील भाग स्वतःच कापून घेत असते.
संशोधकांनी अलिकडेच एक अध्ययन केले असून यात एका रसायनासंबंधी शोध लागला आहे, हे रसायन अशाप्रकारच्या घातक उन्मादासाठी जबाबदार आहे. अंडी दिल्यावर मादी ऑक्टोपसच्या हार्मोन्समध्ये कोलेस्ट्रॉल आधारित अनेक बायोकेमिकल पाथवेजमध्ये बदल होतात, यामुळे स्टेरॉइड हार्मोनचे उत्पादन वाढत असल्याचे संशोधकांचे मानणे आहे.

ऑक्टोपसच्या आत्महत्येकरता यापूर्वी वेगळाच युक्तिवाद करण्यात येत होता. ऑक्टोपसच्या स्वघातकी वर्तनामुळे अन्य शिकारी जीव अंडय़ांपासून दूर राहत असल्याचे मानले जात होते. शिकागो युनिव्हर्सिटीत संशोधन करणाऱया मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट जेड यान वांग यांनी मादी ऑक्टोपसचे अशाप्रकारचे वर्तन पिल्लांना प्रौढ ऑक्टोपसपासून वाचविणारे असू शकते असे म्हटले आहे.
ब्रँडिस विद्यापीठातील मनोवैज्ञानिक जेरोम वोडिंस्की यांनी 1977 मध्ये एका संशोधनात या आत्महत्येमागे ऑप्टिक ग्लँडचा हात असल्याचा दावा केला होता. ऑप्टिक ग्लँड ऑक्टोपसच्या डोळय़ांनजीक ग्लँड्सचा एक समूह आहे. हे सिफैलोपोड्समध्ये वय वाढण्याशी संबंधित असते. मादी ऑक्टोपसमधून ऑप्टिक ग्लँड हटविण्यात आल्यास ती अंडी दिल्यावर अनेक महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकते असे वोडिंस्की यांनी आढळून आले होते. वांग आणि त्यांच्या सहकाऱयांनी मादी ऑक्टोपसच्या ऑप्टिक ग्लँडमधून बाहेर पडणाऱया अणूंचे थेट विश्लेषण केले. हे संशोधन करंट बायोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहे.









