केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे प्रतिपादन
पणजी / प्रतिनिधी
जागतिक व्यवस्थेत भारताची प्रतिष्ठा वाढत असून एक शक्तिशाली देश बनत आहे, तरीसुद्धा कोणत्याही देशाला भारताकडून कधीही धोका वाटणार नाही. कारण आपली सांस्कृतिक मूल्ये आपल्याला इतरांवर वर्चस्व गाजवण्यापासून रोखतात. त्यामुळे आपण आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल जागृत राहणे गरजेचे आहे. एक राष्ट्र म्हणून भारताला या समृद्ध सांस्कृतिक वारशावर उभारण्याची गरज आहे, असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले. इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) द्वारे बिकानेर स्थित सामाजिक-सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात ’भारतीयता’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रेश्मा आरिफ, बिका उत्सवचे अनिल गुप्ता उपस्थित होते.
भारताला ज्ञानाचे भांडार मानले जाते. स्वामी विवेकानंद आणि स्वामी रंगनाथ नंद या दोघांनीही भारताला ‘ज्ञान सभ्यता’ म्हणून संबोधले, परंतु आमच्या जनतेने ज्ञान नाकारून या सभ्यतेचा फायदा न घेतल्याबद्दल त्यांनी भारतावर टीकाही केली. आपल्या भारतीय सभ्यतेची व्याख्या आपल्या सामूहिक ‘आत्मा’ द्वारे केली जाते असे नंद यांचे मत होते. लोकांनी वेगवेगळ्या मार्गांनी सत्याचा शोध घेतला तरी, आम्ही भारतीय वेगवेगळ्या लोकांच्या सहवासाबाबत विरोधी नव्हतो आणि हाच भारतीयतेचा पाया आहे.
आद्य शंकराचार्यांनी सांस्कृतिक व आध्यात्मिक एकात्मता निर्माण केली. देशाच्या विविध भागात त्यांनी वेद दिले. आपण आध्यात्मिकरित्या जोडलेले आहोत, याची अनुभूती त्यांनी दिली. सभ्यता ही ज्ञानावर अवलंबून असून दरवेळी नवीन गोष्टी समजण्याची संधी देते. भारतातील शांतता ही तांत्रिकरित्या केलेली तडजोड नसून संपूर्ण अखंडता आहे. भारतीय सभ्यता ही विविधतेतून आलेली आहे. त्यामुळे आम्ही आपली संस्कृती समजून घेणे गरजेचे आहे, असे मत आरिफ यांनी व्यक्त केले.
1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यावेळी वैविध्यपूर्ण लोकांना एकत्र करणे खूप कठीण होते. याशिवाय आमच्या विचारवंत नेत्यांचा असा विश्वास होता की भारताचे बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या एकच अस्तित्व आहे. परंतु विचारवंतांनी त्यातूनच एका अनेकतावादी राष्ट्राचे अस्तित्व निर्माण केले. आम्ही भारतीय विविधतेचा आदर करतो. आम्ही भारतीय एक वंश म्हणून विविध लोक किंवा वंशांबाबत अस्वस्थ नाही. हेच भारतीयतेचे सार आहे, असे आरिफ यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयसीजीचे यतीन काकोडकर यांनी केले तर आभार अनिल गुप्ता यांनी मानले.









