पुणे / वार्ताहर :
बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर करुन जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी मिळवणाऱ्या महिलेविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता दत्तात्रय झुरंगे (रा. लोणीकंद, नगर रस्ता ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी किसन भुजबळ (वय 53) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संगीता झुरंगे लोणीकंद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षिका आहे. त्या अकरावी उत्तीर्ण आहेत. बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर करुन त्यांनी नोकरी मिळवल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी करण्यात आली. संगीता यांची बहीण बारावी उत्तीर्ण झाली आहे. तिचे नाव आणि शैक्षणिक कागदपत्रांचा वापर करुन झुरंगे यांनी डीएड अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षिका म्हणून नोकरी मिळवली. त्यांनी राजपत्रात नावात बदल केला. बनावट शैक्षणिक कागपत्रांचा वापर करुन डीएड अभ्यासक्रम पूर्ण करुन जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी मिळवल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. लोणीकंद पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
अधिक वाचा : पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी









