बेळगाव उत्तर, दक्षिण वेटींगवरच : निपाणीतून काका पाटील रिंगणात,तिसरी यादी 10 एप्रिलनंतर

बेंगळूर : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 42 जणांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. उत्सुकता लागून राहिलेल्या निपाणी मतदारसंघातून काका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या शशिकला जोल्ले यांच्याविरुद्ध काका पाटील निवडणूक रिंगणात दिसून येतील. मात्र, बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघासाठी अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. त्यामुळे तिसरी यादी जाहीर होईपर्यंत येथील काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम राहणार आहे. काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी 10 एप्रिलनंतर जाहीर होणार असल्याचे सुत्रांकडून समजते. काँग्रेसने पहिल्या यादीत 124 उमेदवार जाहीर केले होते. आता 42 उमेदवार जाहीर करण्यात आले असून एकूण 166 उमेदवारांची नावे आतापर्यंत घोषित झाली आहेत. त्यामुळे बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिणसह 58 मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करणे बाकी आहे. दुसऱ्या यादीनुसार बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातून काका पाटील, गोकाकमधून महांतेश कडाडी, कित्तूरमधून बाबासाहेब पाटील, सौंदत्तीमधून विश्वास वैद्य यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. तर धारवाड जिल्ह्यातील कलघटगीतून संतोष लाड, धारवाड-विनय कुलकर्णी, कारवार जिल्ह्यातील शिरसीतून भीमण्णा नायक, यल्लापूरमधून व्ही. एस. पाटील या नावांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांनी ही उमेदवार यादी जाहीर केली आहे.
हायकमांडची सावध भूमिका
काँग्रेसला दुसरी यादी तयार करण्यासाठी बरीच कसरत करावी लागली आहे. मंगळवारपासून तीन दिवस काँग्रेसच्या राष्ट्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या कालावधीत 42 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. उर्वरित मतदारसंघांमध्ये दोनपेक्षा अधिक इच्छुक असून कोणाला तिकीट द्यावे? नव्याने पक्षात येणाऱ्यांसाठी तिकीट द्यावे की नाही?, बंडखोरी होण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघांमधील उमेदवार अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीत.
मेलुकोटे येथे सर्वोदय पक्षाला पाठिंबा
दिवंगत माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांचे पुत्र विजय धरमसिंग यांना बिदर जिल्ह्यातील बसवकल्याणमधून तिकीट देण्यात येणार आहे. निजदमधून अरकलगूड मतदारसंघांचे उमेदवार ए. मंजुनाथ यांचे पुत्र डॉ. मंथरगौडा यांना मडिकेरीतून रिंगणात उतरविण्यात येणार आहे. सिद्धरामय्या निवडून आलेल्या बदामी मतदारसंघातून माजी मंत्री बी. बी. चिम्मनकट्टी यांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. मंड्या जिल्ह्यातील मेलुकोटे येथे काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सर्वोदय कर्नाटक पक्षाचे उमेदवार व शेतकरी नेते दिवंगत पुट्टणय्या यांचे पुत्र दर्शन पुट्टणय्या यांना पाठिंबा दिला आहे.
जातनिहाय उमेदवारांची आकडेवारी
दुसऱ्या यादीत काँग्रेसने लिंगायत समुदायाला 10, वक्कलिग समुदायाला 10, रे•ाr लिंगायत, रजपूत, मराठा, रे•ाr, नायडू समुदायाला प्रत्येकी 1, अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमातीसाठी 2 आणि कुरुब समुदायासाठी 3 तिकीट जाहीर केले आहे.
कोलारचा समावेश दुसऱ्या यादीतही नाही
बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिणसह कोलार, लिंगसगूर, पुलकेशीनगर, कुंदगोळ, हरिहर, शिड्लघट्ट, के. आर. पुरम, बोम्मनहळ्ळी, दासरहळ्ळी, सी. व्ही. रामननगर, बेंगळूर दक्षिण मतदारसंघांसाठी दुसऱ्या यादीतही उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये कोणाला उमेदवारी देणार, याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कोलार, विद्यमान आमदार व्ही. मुनियप्पा यांच्या शिड्लघट्ट मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केलेली नाही. चित्रदुर्गमध्ये माजी विधानपरिषद सदस्य रघु आचार यांना तिकीट नाकारण्यात आले असून विरेंद्र यांना संधी देण्यात आले आहे. भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेल्या बाबुराव चिंचनसूर यांनातही तिकीट देण्यात आले आहे. माजी मंत्री विनय कुलकर्णी हे हावेरी जिल्ह्यातील शिग्गावमधून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याविरुद्ध निवडणूक लढवतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना धारवाडमधून तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
अशोक पुजारींना तिकीट नाकारले

काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होताच तिकीट हुकलेल्या अनेकांनी आंदोलन सुरू केले आहे. गोकाकमध्ये अशोक पुजारी हे काँग्रेसच्या तिकिटाचे प्रमुख दावेदार होते. मात्र, त्यांना तिकीट नाकारण्यात आले असून महांतेश कडाडी यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अशोक पुजारी यांच्या समर्थकांनी आंदोलन केले आहे.
पक्षांतर करून आलेल्यांना प्राधान्य
भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री एन. वाय. गोपालस्वामी, गुब्बीची माजी आमदार एस. आर. श्रीनिवास, बाबुराव चिंचनसूर, व्ही. एस. पाटील, इक्बाल अन्सारी यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. पक्षांतर करून आलेल्येंना प्राधान्य देण्यात आल्यामुळे मूळ काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
तिकीट हुकल्याने नाराजी
धारवाड जिल्ह्यातील कलघटगीतून संतोष लाड यांना तिकीट देण्यात आल्याने नागराज छब्बी नाराज झाले आहेत. ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. छब्बी यांनी रात्री आपल्या समर्थकांची बैठक घेतली. दुसरीकडे मंड्या जिल्हा काँग्रेसला कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. वाय. एस. व्ही. दत्ता वगळता पक्षांतर करून आलेल्या सर्वांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. वाय. एस. व्ही. दत्ता यांना मातृपक्षात प्रवेश करण्यासाठी निजदकडून ऑफर देण्यात आली आहे. कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती मतदारसंघातून इक्बाल अन्सारी यांना तिकीट जाहीर झाल्यामुळे एच. आर. श्रीनाथ हे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे.
धारवाड प्रवेशावर निर्बंध असताना विनय कुलकर्णींना तिकीट
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. धारवाड मतदारसंघातून निवडणुकीसाठी माजी मंत्री निनय कुलकर्णी यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. भाजप नेते आणि धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा यांच्या हत्या प्रकरणात आरोप असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विनय कुलकर्णी यांना धारवाड जिल्हा प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. कुलकर्णी यांनी धारवाड प्रवेशाविषयी फेरविचार याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्थानिक न्यायालयाकडे सोपविली होती. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. असे असताना काँग्रेसने विनय कुलकर्णींना धारवाडमधून तिकीट जाहीर केल्यामुळे कुतूहल निर्माण झाले आहे. न्यायालयाने कुलकर्णींना धारवाड प्रवेशाला परवानगी दिली तर ते धारवाडमधून रिंगणात उतरतील. अन्यथा त्यांना शिग्गावमधून तिकीट दिले जाऊ शकते.
तीन विद्यमान आमदार प्रतीक्षेत
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत पुलकेशीनगरचे विद्यमान आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती, कुंदगोळच्या आमदार कुसुमा शिवळ्ळी आणि हरिहरचे आमदार रामप्पा यांना तिकीट जाहीर करण्यात आलेले नाही. या मतदारसंघांमध्ये चूरस अधिक असल्याने या विद्यमान आमदारांना अद्याप तिकीट जाहीर करण्यात आलेले नाही.
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील नावे…
मतदारसंघ उमेदवारांची नावे
- निपाणी काका पाटील
- गोकाक महांतेश कडाडी
- कित्तूर बाबासाहेब पाटील
- सौंदत्ती विश्वास वैद्य
- कलघटगी संतोष लाड
- धारवाड विनय कुलकर्णी
- शिरसी भीमण्णा नायक
- मुधोळ आर. बी. तिम्मापूर
- यल्लापूर व्ही. एस. पाटील
- नरगुंद बी. आर. यावगल
- बदामी बी. बी. चिम्मनकट्टी
- बागलकोट एच. वाय. मेटी
- विजापूर शहर अब्दुल हमीद काजासाहेब मुश्रीफ
- बसवकल्याण विजय धरमसिंग
- मडिकेरी डॉ. मंथरगौडा
- नागठाण विठ्ठल कटकधोंड
- अफजलपूर एम. वाय. पाटील
- यादगीर चेन्नारे•ाr पाटील-तन्नूर
- गंगावती इक्बाल अन्सारी
- कोडिलगी डॉ. श्रीनिवास
- मोळकाल्मूर एन. वाय. गोपालकृष्ण
- चित्रदुर्ग के.सी. विरेंद्र
- होळल्केरे एच. अंजनेय
- चेन्नगिरी बसवराजू शिवगंगा
- तीर्थहळ्ळी किम्मने रत्नाकर
- उडुपी प्रसादराज कंचन
- कडूर आनंद के. एस.
- तुमकूर इक्बाल अहमद
- गुब्बी एस. आर. श्रीनिवास
- यलहंका केशव राजन्ना बी.
- यशवंतपूर एस. बालराज गौडा
- महालक्ष्मी लेआऊट केशवमूर्ती
- पद्मनाभनगर व्ही. रंगनाथ नायडू
- मंड्या पी. रविकुमार
- कृष्णराजपेठ बी. एल. देवराज
- बेलूर बी. शिवराम
- मडिकेरी डॉ. मंथरगौडा
- चामुंडेश्वरी सिद्धेगौडा
- कोळ्ळेगाल ए. आर. कृष्णमूर्ती









