आयपीएल 16 : आरसीबीवर 81 धावांनी मात, सामनावीर शार्दुल, रिंकू, गुरबाज यांची धडाकेबाज अर्धशतके, वरुणचे 4, सुयशचे 3 बळी

वृत्तसंस्था /कोलकाता
सोळाव्या आयपीएलमधील गुरुवारी झालेल्या सामन्यात शार्दुल ठाकुर, रहमानुल्लाह गुरबाज यांची तडाखेबंद अर्धशतके आणि मिस्टरी स्पिनर्स वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा व सुनील नरेन यांनी केलेल्या भेदक माऱयाच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरवर 81 धावांनी दणदणीत विजय मिळविला. 29 चेंडूत 68 धावा आणि एक बळी मिळविणाऱया शार्दुल ठाकुरला सामनावीराचा बहुमान मिळाला. कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 204 धावांचा डोंगर उभारला. ठाकुरने 68 तर गुरबाजने 57 धावा फटकावल्या. याशिवाय रिंकू सिंगनेही 46 धावांचे योगदान दिले. त्यानंतर आरसीबीने सुरुवात चांगली केली होती. पण कोहली बाद झाल्यानंतर त्यांच्या डावाला गळती लागली ती अखेरपर्यंत थांबली नाही. कोहली (18 चेंडूत 21), कर्णधार डु प्लेसिस (12 चेंडूत 23), मायकेल ब्रेसवेल (18 चेंडूत 19), डेव्हिड विली (20 चेंडूत नाबाद 20) व आकाश दीप (8 चेंडूत 17) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. सुनील नरेनने कोहलीला बाद केल्यानंतर वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीवर झटपट तीन बळी टिपले. शेवटी आपल्याच गोलंदाजीवर आकाश दीपचा उंच उडालेला झेल त्यानेच टिपत आरसीबीचा डाव 17.4 षटकांत 123 धावांत संपुष्टात आणत केकेआरचा विजय साकार केला. वरुणने 4, सुयश शर्माने 3, सुनील नरेनने 2 व ठाकुरने एक बळी मिळविला. स्पिनर्सनीच एकूण 9 बळी मिळविले. केकेआरचा हा पहिला विजय असून ते आता गुणतक्त्यात तिसऱया स्थानावर पोहोचले आहेत.

गुरबाज, रिंकू, शार्दुलची फटकेबाजी
आरसीबीकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. बाऊन्स असणाऱया खेळपट्टीवर वेंकटेश अय्यर, मनदीप सिंग, कर्णधार नितिश राणा लवकर बाद झाल्याने सातव्या षटकातच त्यांची स्थिती 3 बाद 47 अशी झाली. सलामीवीर गुरबाजने रिंकू सिंगच्या साथीने केकेआरचा डाव थोडाफार सावरताना तिसऱया गडय़ासाठी 42 धावांची भागीदारी केली. त्यांचा स्फोटक फलंदाजा आंद्रे रसेल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण गुरबाज, रिंकू सिंग व शार्दुल ठाकुर यांनी त्याची भरपाई करीत धडाकेबाज अर्धशतके नोंदवली. गुरबाजने 38 चेंडूत अर्धशतक केले. त्याने 44 चेंडूत 57 धावा फटकावताना 6 चौकार, 3 षटकार मारले. तो व रसेल कर्ण शर्माच्या लागोपाठच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर रिंकू सिंग व शार्दुल ठाकुर यांनी तुफान फटकेबाजी करीत सहाव्या गडय़ासाठी केवळ 45 चेंडूत 103 धावा झोडपल्या आणि संघाला दोनशेजवळ टप्पा गाठून दिला. रिंकू सिंगला हर्षल पटेलने 46 धावांवर बाद केले. त्याने 33 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार फटकावले. शार्दुलने प्रतिहल्ला करीत केवळ 20 चेंडूत अर्धशतकी मजल मारली. अखेरच्या षटकात तो उत्तुंग फटका मारताना बाद झाला. त्याने 29 चेंडूतच 9 चौकार, 3 षटकार ठोकत 68 धावा झोडपल्या. या तिघांव्यतिरिक्त केकेआरच्या अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. डेव्हिड विली वगळता आरसीबीच्या अन्य गोलंदाजांना आपला प्रभाव पाडता आला नाही. आकाश दीपने 2 षटकात 30 धावा दिल्या तर सिराजने 1 बळीसाठी 44 धावा दिल्या. याशिवाय केकेआरला 23 धावा अवांतराच्या रूपात मिळाल्या. त्यात 10 वाईड व 3 नोबॉल्सचा समावेश आहे. विलीने 4 षटकांत 16 धावा देत 2 तर कर्ण शर्माने 26 धावांत 2 बळी मिळविले. हर्षल पटेल व मायकेल ब्रेसवेल यांना एकेक बळी मिळाला.

संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 7 बाद 204 : रहमानुल्लाह गुरबाज 57 (44 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), वेंकटेश अय्यर 3, मनदीप सिंग 0, नितिश राणा 1, रिंकू सिंग 46 (33 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), रसेल 0, शार्दुल ठाकुर 68 (29 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार), सुनील नरेन नाबाद 0, उमेश यादव नाबाद 6, अवांतर 23. गोलंदाजी : डेव्हिड विली 2-16, कर्ण शर्मा 2-36, सिराज 1-44, ब्रेसवेल 1-34, हर्षल पटेल 1-38.
आरसीबी 17.4 षटकांत सर्व बाद 123 : कोहली 21 (18 चेंडूत 3 चौकार), डु प्लेसिस 23 (12 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), ब्रेसवेल 19 (18 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), डेव्हिड विली नाबाद 20 (20 चेंडूत 2 चौकार), आकाश दीप 17 (8 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अवांतर 6. गोलंदाजी : वरुण चक्रवर्ती 4-15, सुयश शर्मा 3-30, सुनील नरेन 2-16, शार्दुल ठाकुर 1-15.









