शाहीनबाग हे स्थान दिल्लीतील, तर केरळ राज्य हे भारताच्या दक्षिण टोकाकडचे राज्य आहे. या दोन्हीमध्ये काय संबंध असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण केरळमध्ये नुकतेच रेल्वेमध्ये तीन सहप्रवाशांना जाळून मारण्याचे प्रकरण घडले. या प्रकरणात अटक करण्यात आलेला शाहरुख सैफी हा प्रमुख संशयित हा शाहीनबागचा रहिवासी आहे. त्याला बुधवारी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी दलाकडून अटक करण्यात आली. त्याने केरळमधील कोझिकोडे रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेत एका सहप्रवाशावर ज्वालाग्रही द्रवपदार्थ फेकला आणि आग लावली. ती आग इतरत्र पसरली आणि ज्याला आग लावण्यात आली होती, त्याच्यासह एक महिला आणि दीड वर्षांची एक मुलगी यांनी आगीपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात डब्यातून खाली उडी मारली. पण रेल्वेखाली पडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. डब्यातील अन्य 9 ते 10 प्रवाशांनाही आगीमुळे जखमा झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता या प्रकरणाची एनआयए, केरळ सरकार आणि भारतीय रेल्वेपोलिसांकडून चौकशी होईल आणि पुढची कारवाई होईल. आपल्याला मागणे जाळून मारण्यास सांगण्यात आले होते, अशी कबुली त्याने पोलिसांना प्राथमिक तपासणीत दिली, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याने कबुली दिलेले हे कृत्य क्रूरतेचा कळस आहे. कोणी त्याला माणसे अशी मारण्यास सांगितले ते कालांतराने बाहेर येईलच. पण कोणीतरी सांगितले म्हणून असे करण्याचे दुःसाहस त्याला कसे झाले हा मूळ प्रश्न आहे. दहशतवादाचा हा नवीन प्रकार शोधण्यात आला असून त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱया प्रवाशाचा जीव धोक्यात येऊ शकतो. आतापर्यंतच्या तपासानुसार ज्या प्रवाशाला जाळण्यात आले त्याने कोणतेही प्रक्षोभक कृत्य जाळणाऱया विरोधात केले नव्हते. त्यांच्यात कोणतेही भांडण किंवा वादावादी झाली नव्हती, अशा साक्षी सहप्रवाशांनी नोंदविलेल्या आहेत. याचाच अर्थ असा की, हा सर्व प्रकार भावनेच्या भरात नव्हे, तर एका व्यापक करस्थानाच्या अंतर्गत, पूर्वनियोजित आणि अतिशय थंड डोक्याने, हेतुपुरस्सर करण्यात आला आहे. आरोपी दिल्लीच्या शाहीनबागचा असणे, त्याने थेट केरळमध्ये येऊन हे दहशतवादी क्रूरकृत्य करणे आणि त्याला महाराष्ट्राच्या रत्नागिरीत अटक होणे, यातून या कारस्थानाचे देशव्यापी स्वरुप स्पष्ट होते. ही केवळ एक मानसिक विकृतता आहे, असे सांगण्याचा आता प्रयत्न होईल. प्रत्येकवेळी जेव्हा एका ‘विशिष्ट’ समाजघटकाचे लोक अशा कृत्यांमध्ये पकडले जातात, तेव्हा त्यांचे नातेवाईक असाच बचाव करतात आणि आपले हात झटकतात. काही पुरोगामी म्हणवून घेणाऱया वृत्तसंस्था आणि माध्यमेही अशा बनावट आणि साळसूद बचावाला वारेमाप प्रसिद्धी देऊन देशाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात. या प्रकरणातही काही वृत्तपत्रांनी हा शाहरुख सैफी कसा ‘अंतर्मुख’ (इंट्रोव्हर्ट) आहे, तो कसा शांत प्रवृत्तीचा असल्याचे त्याच्या जवळच्यांना वाटते आणि तो असे काही करेल असे त्याच्या वस्तीत कसे कोणालाच वाटले नव्हते,’ हा नेहमीचा सूर आळवून त्याच्यासंदर्भात सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे प्रयत्न त्याच्या घृणित कृत्याइतकेच, किंबहुना, त्याहीपेक्षा क्रूर आहेत. विशेष म्हणजे असे हे वृत्तपत्रे आणि मीडियामधून होणारे सहानुभूती निर्माण करण्याचे प्रयत्न असे क्रूरात्मे आणि दहशतवादी ‘विशिष्ट’ धर्माचे असतात तेव्हाच उफाळून येतात. इतर कोणत्या समाजातील व्यक्तीसंबंधी अशी वृत्ते प्रसिद्ध होत नाहीत. यावरुन स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱया या वृत्तसंस्था प्रत्यक्षात किती संकुचित वृत्तीच्या आणि केवळ विशिष्ट समाजघटकासंबंधी किती अतिसंवेदनशील असतात याचा परिचय होतो. यामुळे ‘विशिष्ट’ दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते माणसे मारण्याचे वेगवेगळे मार्ग अधिकच उत्साहाने शोधू लागतात. त्यामुळे दहशतवाद्यांना पकडून त्यांना शिक्षा करण्याचे काम सरकार तर करेलच. पण अशा दहशतवाद्यांचे नैतिक बळ वाढविणारी, त्यांच्यासंबंधी सहानूभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी वृत्ते आणि प्रसंग प्रसिद्ध करणारी माध्यमे आणि वृत्तसंस्था यांना धडा शिकविण्याचे काम जागृत जनतेला करावे लागणार आहे. जोपर्यंत ‘विशिष्ट’ प्रकारच्या दहशतवाद्यांना पुरोगामी म्हणवून घेणाऱयांकडून असे साळसूद तितकेच पोरकट पाठबळ मिळत राहील तोपर्यंत दहशतवाद संपविण्याच्या कामात कोणत्याही सरकारला किंवा तपास संस्थांना यश येणार नाही. तेव्हा दहशतवाद संपविण्याचे काम केवळ सरकारचे आहे अशा समजुतीत जनतेनेही राहू नये. दहशतवाद्यांना संपविणे जसे आवश्यक आहे, तसेच त्यांच्या छुप्या किंवा उघड सहानुभूतीदारांनाही त्यांची जागा दाखवून देणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा शाहीनबाग ते केरळ आणि पंजाब ते पश्चिम बंगाल अशी दहशतवादी कृत्ये नुसती घडतच राहतील असे नव्हे, तर त्यांचे प्रमाणही वाढेल. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱया राजकीय पक्षांनीही हा धोका ओळखला पाहिजे आणि केवळ मतांसाठी असणाऱया बोटचेप्या धोरणाचा त्याग केला पाहिजे. दहशतवाद हा देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांच्या मुळावरचा घाव आहे, असे मानूनच सर्व शक्तीनिशी त्याच्याशी दोन हात सर्वांनाच करावे लागणार आहेत. हा राजकारणापलिकडचा प्रश्न असून त्याने आजवर प्रत्येक सरकारला छळले आहे. सरकारांचीं किंवा ती चालविणाऱया राजकीय पक्षांची विचारसरणी कोणतीही असो, दहशतवादाची विचारसरणी ही देशविघातकच असते. त्यामुळे केवळ एकगठ्ठा मतांचा विचार करुन तसेच विशिष्ट समाजातील दहशतवाद्यांविरोधात कठोर धोरण स्वीकारल्यास तो समाज आपल्यापासून दूर जाईल, अशा भीतीपोटी कोणता राजकीय पक्ष दहशतवाद्यांसंबंधी सौम्य धोरण घेत असेल तर तसे धोरण त्या पक्षाच्या दृष्टीनेही आत्मघातकी आहे, याची पक्की खूणगाठ अशा पक्षांनी बांधली पाहिजे. थोडक्यात सांगायचे, तर या प्रश्नाकडे नेहमीच्या पक्षीय राजकारणाच्या बाहेर जाऊन राष्ट्रीय प्रश्न म्हणूनच पाहिले पाहिजे. तरच, दहशतवादाचा हा आसूर नष्ट करण्यात यश येईल. अन्यथा त्याचा उपद्रव वाढतच राहणार हे निश्चित.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








