पावणे तीन लाखांचा अफू हस्तगत लोणंद पोलिसांत गुन्हा दाखल
वार्ताहर/ लोणद
मुळीकवाडी (ता. फलटण) गावच्या बाचकी नावचे शिवारात सुरेश शिवराम पवार (वय 46 रा. मुळीकवाडी ता. फलटण) यांच्या शेतात लोणंद पोलिसांनी केलेल्या छाप्यात 12 किलो 460 ग्रॅम अफु मिळुन आला असून त्याची अंदाजे किंमत 2 लाख 77 हजार रुपये असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली. सुरेश शिवराम पवार यांनी त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये अफु या अंमली पदार्थांच्या झाडाची लागवड केली असून त्याची जोपासना करत आहे. बातमी मिळताच वायकर यानी छाप्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार, पंच यांच्यासमवेत मुळीकवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत बाचकी नावचे शिवारात गेले. वाहने रोडच्याकडेला लावून मिळालेल्या बातमीचे ठिकाणी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गेले असता सुरेश शिवराम पवार यांच्या समवेत त्यांच्या शेताची पाहणी केली असता त्यांच्या मालकीच्या कांद्याच्या पिकाच्या शेतामध्ये अंमली पदार्थ अफुच्या झाडांची लागवड करून ती झाडे जोपासली असल्याचे दिसून आले. त्यांनीच अफुच्या झाडांची लागवड केल्याचे सांगितले. त्यातील काही झाडांची बोंडे तोडली असल्याचे दिसल्याने त्यास विचारले. त्यावेळी त्याने बोंडे नसलेल्या झाडाची बोंडे तोडून शेजारच्या शेतातील मक्याच्या पिकामध्ये खसखस काढण्याकरिता काढुन ठेवल्याचे सांगितले. तसेच एक प्लास्टिकची पिशवी काढून दिली. त्या पिशवीमध्ये अफुच्या झाडांची तोडलेली बोंडे मिळुन आली. ती झाडे उपटून मोजली असता 2737 एवढी भरली. सदर शेतात एकुण 12 किलो 460 ग्रॅम वजनाचा अफु मिळुन आला आहे, अशी खबर वैभव सावंत यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार या करत आहेत.








