तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडची 1-1 अशी बरोबरी, सामनावीर अॅडम मिल्नेचे 26 धावांत 5 बळी
वृत्तसंस्था/ ड्युनेडिन
श्रीलंका व न्यूझीलंड यांच्च्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान न्यूझीलंडने लंकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रारंभी, सामनावीर अॅडम मिल्नेच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 19 षटकांत 141 धावांवर आटोपला. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य किवीज संघाने 14.4 षटकांत 1 गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडच्या टीम सिफर्टने 43 चेंडूत 3 चौकार व 6 षटकारासह नाबाद 79 धावांची खेळी साकारत विजयात मोलाचे योगदान दिले. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. उभय संघातील तिसरा व अंतिम सामना 8 एप्रिल रोजी क्वीन्सटाऊन येथे खेळवण्यात येईल.
प्रारंभी, किवीज कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवताना लंकेला अवघ्या 141 धावांत गुंडाळले. लंकेतर्फे धनजंय डी सिल्वाने सर्वाधिक 37 धावा केल्या तर कुसल परेराने 35, असालंकाने 24, कुसल मेंडिसने 10 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना मात्र दुहेरी आकाडही गाठता आला नाही. अॅडम मिल्नेने शानदार गोलंदाजी करताना 26 धावांत 5 बळी घेत लंकन फलंदाजीचे कंबरडे मोडले. याशिवाय, बेन लिस्टरने 26 धावांत 2 बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

सिफर्टची आक्रमक अर्धशतकी खेळी
प्रत्युतरादाखल खेळताना विजयासाठीचे लक्ष्य किवीज संघाने 14.4 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करत विजय संपादन केला. सलामीवीर बाऊसने 15 चेंडूत 31 धावा फटकावल्या. पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो रजिथाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर टीम सिफर्ट (43 चेंडूत 3 चौकार व 6 षटकारासह नाबाद 79) व कर्णधार टॉम लॅथम (30 चेंडूत नाबाद 20) यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सिफर्टने चौफेर फटकेबाजी करताना लंकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. लंकेकडून रजिथाने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 19 षटकांत सर्वबाद 141 (निसांका 9, कुसल मेंडिस 10, कुसल परेरा 35, धनजंय डी सिल्वा 37, असालंका 24, दसुन शनाका 7, अॅडम मिल्ने 26 धावांत 5 बळी, लिस्टर 26 धावांत 2 बळी, रविंद्र, नीशम प्रत्येकी एक बळी).
न्यूझीलंड 14.4 षटकांत 1 बाद 146 (बाऊस 31, सिफर्ट 43 चेंडूत नाबाद 79, टॉम लॅथम 30 चेंडूत नाबाद 20, रजिथा 25 धावांत 1 बळी).









