अर्लीन्स मास्टर्स बॅडमिंटन : तनिशा-अश्विनीही विजयी, समीर वर्मा पराभूत
वृत्तसंस्था/ अर्लीन्स, फ्रान्स
भारताचा बॅडमिंटनपटू समीर वर्मा येथे सुरू झालेल्या अर्लीन्स मास्टर्स बीएफडब्ल्यू सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाला तर मिथुन मंजुनाथ व प्रियांशू राजावत यांनी एकेरीची दुसरी फेरी गाठली. पुऊष दुहेरीत एमआर अर्जुन व ध्रुव कपिला, महिला दुहेरीत तनिशा व्रॅस्टो व अश्विनी पोन्नप्पा यांनीही विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
समीर वर्माने आयर्लंडच्या एन्हात एन्ग्युएनविऊद्ध पहिला गेम जिंकून आघाडी घेतली होती. पण नंतरच्या गेममध्ये हा जोम त्याला टिकविता आला नाही. एन्ग्युएनने ही लढत 19-21, 21-19, 21-17 अशी जिंकली. मंजुनाथने डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेन्डसेनवर चुरशीचा लढतीत 24-22, 25-23 अशी मात केली तर राजावतने आपल्याच देशाच्या किरण जॉर्जचा 21-18, 21-13 असा पराभव केला. मंजुनाथची पुढील लढत तैपेईच्या यु जेनशी होईल. जेनला सुदैवानेच दुसऱ्या फेरीत खेळण्याची संधी मिळाली. पाचवा मानांकित रासमुस गेम्केने दुसऱ्या गेममध्ये सामना सोडून दिल्याने जेनला दुसऱ्या फेरीत स्थान मिळाले. गेम्केने पहिला गेम जिंकला होता. राजावतची पुढील लढत जपानच्या केन्टा निशिमोटोशी होईल. निशिमोटोने तैपेईच्या चिया हाओ ली वर 21-18, 21-11 अशी मात केली.
भारताच्या बी साई प्रणीतची सलामीची लढत मलेशियाच्या जुन हाओ लिआँगशी तर महिला एकेरीत सायना नेहवालची लढत तुर्कीच्या नेस्लिहान यिगिटशी होणार आहे. याशिवाय अश्मिता चलिया, तसनिम मिर, आकर्षी कश्यप, तानिया हेमंत यांचेही सामने होणार आहेत.

अर्जुन-कपिला विजयी
पुऊष दुहेरीत एमआर अर्जुन व ध्रुव कपिला या सातव्या मानांकित जोडीने झेक प्रजासत्ताकच्या ऑन्द्रsज क्राल व अॅडम मेन्ड्रेक यांच्यावर 21-13, 22-20 अशी मात केली. महिला दुहेरीत तनिशा व्रॅस्टो व अश्विनी पोन्नप्पा यांनीही विजयी सलामी देताना आयर्लंडच्या केट फ्रॉस्ट व मोया रेयान यांना 21-9, 21-9 असे सहज हरविले. सिमरन सिंघी व रितिका ठाकर यांना मात्र इंडोनेशियाच्या लॅनी ट्रिया मायासरी व रिबका सुगियार्तो यांच्याकडून 21-14, 21-15 असा पराभव स्वीकारावा लागला.
याशिवाय एकेरीत खेळणाऱ्या अन्य तीन भारतीयांनाही पराभूत व्हावे लागले. एस. शंकर मुथुसामी सुब्रमण्यम पात्रतेच्या पहिल्या फेरीत अझरबैजानच्या अॅडे रेस्की द्विकाह्योला 21-17, 21-17 असे हरविले, पण दुसऱ्या सामन्यात त्याला स्वीडनच्या फेलिक्स ब्युअरस्टेडकडून 12-21, 21-18, 21-17 अशी हार पत्करावी लागली. मीराबा लुवांग मैस्नम जर्मनीच्या पॅबियन रॉथकडून पहिल्याच फेरीत पराभूत झाला तर महिला एकेरीत अनुपमा उपाध्यायने युक्रेनच्या पोलिना बुहरोव्हावर 14-21, 21-17, 21-5 अशी मात केली. पण पात्रतेच्या दुसऱ्या लढतीत ती तुर्कीच्या नेस्लिहान यिगिटकडून पराभूत झाली. मिश्र दुहेरीत साई प्रतीक के व तनिशा व्रॅस्टो यांनी मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी सर्बियाचे मिहाजलो टॉमिक व अँजेला व्हिटमन यांनी सामना अर्धवट सोडून दिल्याने त्यांना पुढे चाल मिळाली.









