मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण ः अखिलेश यादव यांनी स्वीकारला पुरस्कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) संस्थापक दिवंगत मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे पुत्र आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा सन्मान स्वीकारला. राष्ट्रपती भवनात बुधवारी एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती, अभिनेत्री रवीना टंडन यांच्यासह अन्य मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करून गौरवित करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. या विजेत्यांपैकी पहिल्या टप्प्यातील पुरस्कार वितरण सोहळा पंधरवडय़ापूर्वी झाला होता. त्यानंतर आता दुसऱया टप्प्यात उर्वरित मान्यवरांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. आचार्य डॉ. सुकामा देवी यांच्यासह प्रेमजीत बारिया, हेमंत चौहान, डॉ. राधाचरण गुप्ता यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. संगीतकार एम. एम. कीरवानी, उस्ताद अहमद हुसेन, उस्ताद मोहम्मद हुसेन, बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आदींनाही सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा बुधवारी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. यादरम्यानचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये रवीना टंडन साडी परिधान करून पारंपरिक लूकमध्ये पोहोचल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान आणि सेवाभावी कार्यासाठी रवीना टंडनला हा पुरस्कार देण्यात आला आहे.









