आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी जेपीसीच्या मागणीवरून विरोधकांचा गदारोळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बुधवारीही काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुऊवातीला दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर दोन वाजता कारवाई पुन्हा सुरू झाल्यानंतर गोंधळ सुरू राहिल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज गुऊवारपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधक अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) मागणीवर ठाम आहेत. काँग्रेसच्या खासदारांनी आजही काळे कपडे परिधान केले होते. दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुऊवारी 6 एप्रिल रोजी संपणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात बहुतांश दिवस गदारोळ सुरू राहिल्याने फारच कमी कामकाज झाले आहे.
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर संयुक्त संसदीय समितीची मागणी आणि राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीवरून लोकसभा-राज्यसभेत गेल्या 13 बैठकांमध्ये गदारोळ झाला. तसेच राहुल गांधींच्या लंडनमधील वक्तव्यावर भाजप खासदारांनीही चांगलाच गदारोळ केला. मात्र, राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आल्यापासून भाजप शांत आहे.
खर्गे यांच्या बैठकीला 12 विरोधी पक्ष उपस्थित
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात बुधवारी सकाळी विरोधी पक्षांच्या खासदारांची बैठक झाली. यामध्ये एकजूट दाखवत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे अदानी प्रकरणी जेपीसी स्थापन करण्याची मागणी करत राहण्याची घोषणा केली. या बैठकीला तृणमूल काँग्रेससह 12 विरोधी पक्षांचे खासदार उपस्थित होते. मात्र, शिवसेनेतील उद्धव गटाचा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हता. तत्पूर्वी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस संसदीय पक्षाची स्वतंत्र बैठक झाली. त्यातही काँग्रेसच्या खासदारांनी जेपीसीच्या मागणीवरून सरकारवर हल्लाबोल करण्याची रणनीती आखली.









